पुणे : ‘शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला असून, २२ जुलैनंतर या निर्णयाचा पुन्हा आढावा घेण्यात येईल,’ अशी माहिती महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिली. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी पुण्यात पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा करणार असल्याचे सोमवारी जाहीर केले. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी महापौरांनी ही पाणीकपात रद्द करण्याची घोषणा केली.

महापालिकेने पालखी सोहळ्यासाठी गेल्या आठवड्यात शहरातील पाणीकपात तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय घेतला. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी धरणात केवळ ५० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दिवसाआड पाणीकपात पुन्हा सुरू करावी लागणार असल्याचे सोमवारी स्पष्ट केले. आयुक्तांच्या या घोषणेनंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. खडकवासला धरणातून कालव्याच्या माध्यमातून विसर्ग सुरू असताना दुसरीकडे पुणेकरांना दिवसाआड पाणी का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

हवामान खात्यानेदेखील १९ जुलैनंतर पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे २२ जुलैपर्यंत पाणीकपात न करता नियमित पाणी देण्यात यावे, असे आदेश प्रशासनाला दिल्याचे महापौर नागपुरे यांनी सांगितले.

नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्याचे आदेश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले. यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. पुढील आठवड्यात हवामान विभागाने पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यानुसार पावसाचा अंदाज घेऊन, सर्वपक्षीय सदस्यांची बैठक घेऊन आणि प्रशासनाबरोबर चर्चा करून २२ जुलैनंतर पाणीकपात सुरू करायची की रद्द करायची याचा निर्णय घेतला जाईल,’ असे महापौर नागपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पाणीसाठा घटत असल्याने आणि यंदा हवामान खात्याने उशिरा आणि कमी पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने १५ जूनपासून पुणे शहरात पाणीकपात सुरू केली. मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. गेल्या महिन्यात १५ जून रोजी धरणात केवळ साडेतीन टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. त्यामध्ये वाढ झाली असून, सद्यःस्थितीला साडेसोळा टीएमसी इतका पाणीसाठा धरणात आहे.

महापौर नागपुरे म्हणाल्या, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत ५० टक्के पाणीसाठा आहे. खडकवासला धरण ९० टक्के भरल्याने कालव्याद्वारे धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने पुणेकरांवर लादण्यात आलेली पाणीकपात तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. उपलब्ध पाण्याचा २२ जुलैनंतर आढावा घेतल्यानंतर पाणीकपातीबाबत निर्णय घेतला जाईल.

स्वयंसेवी संस्थांनी घेतला आक्षेप

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सोमवारी पाणीकपात सुरू करावी लागणार असल्याचे जाहीर केल्यानंतर सजग नागरिक मंचाने त्यावर आक्षेप घेतला होता. खडकवासला धरणसाखळीत जवळपास साडेसोळा टीएमसी पाणी शिल्लक असताना शहरात पुन्हा पाणीकपात करणे खरच गरजेचे आहे का? कालव्यातून पाणी सोडले जात असताना पुणेकरांना दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करण्याची गरज काय ? असा प्रश्न उपस्थित केला. हा निर्णय टँकरवाल्यांसाठी फायद्याचा ठरेल, अशी भीती व्यक्त केली. पाणीकपातीचा निर्णय रद्द करण्याची मागणी मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली.