Pune Water Cut News Update: पुणे शहरावर पाणीकपातीची टांगती तलवार असताना, पुण्याने निवडून दिलेले खासदार, राज्य सरकारमध्ये असलेले शहराचे दोन मंत्री, आमदार, महापालिकेतील विरोधक यांपैकी कुणीच लोकप्रतिनिधी ठोस भूमिका का घेत नाही, असा प्रश्न सामान्य पुणेकरांना पडला आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षांनी, ‘एक थेंबही पाणी कमी होणार नाही,’ असे आश्वासन देऊनही पाणीपुरवठा विभागाने कपातीच्या दोन प्रस्तावांवर काम सुरू केल्याने संभ्रमात भरच पडली आहे. त्यातच, येत्या गुरुवारी देखभाल-दुरुस्तीसाठी शहरात पाणी बंद ठेवण्यात येणार असल्याने, ही पाणीकपातीचीच सुरुवात आहे का, असाही प्रश्न नागरिक विचारत आहेत.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत सध्या १२.५७ टीएमसी (४३.१३ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा एक टीएमसीने अधिक आहे. पण, यंदा ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे मोसमी पाऊस कमी पडण्याची शक्यता असल्याने महापालिकेने आतापासूनच १५ टक्के पाणीकपात करण्यास सुरुवात करावी, अशी नोटीस गेल्या आठवड्यात जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठविली.
या नोटिशीनंतर पाणीकपातीची चर्चा सुरू झाली. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी, कपात करणार नाही, असे म्हटले, तरी ‘जलसंपदा’च्या नोटिशीचा आधार घेऊन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आठवड्यातून एक दिवस पाणी बंद किंवा दिवसाआड पाणीपुरवठा अशा दोन प्रस्तावांवर काम सुरू केले आहे.
गेल्या वर्षी महापालिकेत प्रशासनाची सत्ता होती. यंदा महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर महापालिकेत लोकप्रतिनिधी आले. पुणेकरांनी भाजपला भरभरून मते दिल्याने ११९ जागा जिंकून पक्षाने एकहाती सत्ता स्थापन केली. पुण्याचे लोकसभा खासदारही भाजपचे असून, विधानसभेत पक्षाच्या सहा आमदारांमध्ये दोन मंत्री आहेत.
याशिवाय राज्यसभा आणि विधान परिषदेतही पक्षाचे पुण्यातील प्रतिनिधित्व आहे. मात्र, त्यातील कुणीच पुण्याच्या पाण्याविषयी भूमिका मांडत नाही. राज्यात सत्तेत सहभागी आणि महापालिकेत विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षानेही पाणीकपातीवर ठोस भूमिका मांडलेली नाही. असे का, असा प्रश्न सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी विचारला.
पाणीकपातीबाबत विचारार्थ असलेल्या प्रस्तावांनुसार, आठवड्यातून एक दिवस संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवल्यास पुढील तीन महिन्यांमध्ये १० टक्के, तर एक दिवसाआड पाणी दिल्यास २५ टक्के बचत होणार आहे. मात्र, पुरवठ्यामधील अडथळे लक्षात घेतल्यास एक दिवस पाणी बंद केले, तरी त्याचा परिणाम पुढील दोन दिवस जाणवतो, असा पुणेकरांचा अनुभव आहे. त्याचे काय करणार, या प्रश्नावरही नागरिकांना उत्तर मिळालेले नाही.
महापालिका खडकवासला धरणातून घेत असलेल्या एकूण पाण्यापैकी २५ ते ३० टक्के पाण्याची गळती होते. शहरात तब्बल साडेतीन लाख नळजोडण्या असून, त्यापैकी दीड लाख अनधिकृत असल्याची कबुली महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे. प्रशासनाने या बेकायदा नळजोडांवर कारवाई केली, तरी मोठी बचत होईल, असा दावा केला जातो.
दुसरीकडे, महापालिका मुंढवा जॅकवेलच्या माध्यमातून सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी जलसंपदा विभागाला शेतीसाठी उपलब्ध करून देते. मात्र, जलसंपदा विभाग हे पाणी न घेता धरणातील पाणी शेतीसाठी सोडत असल्याने शहराचे पिण्याचे पाणी कमी होत असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाने आकडेवारीसह केला आहे. त्याबाबतही कुणी लोकप्रतिनिधी जलसंपदा विभागाला प्रश्न विचारत नसल्याने पुण्याच्या कारभाऱ्यांची नेमकी भूमिका काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
महापौर मंजूषा नागपुरे म्हणाल्या, यंदा पाऊस कमी होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे धरणांत पुरेसा साठा असला, तरी पाणी जपून वापरावे लागणार आहे. वाढती लोकसंख्या विचारात घेता, भविष्यात शहराच्या पाणीकोट्यात वाढ करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल.
