पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती आणि वाढत असलेली पाण्याची मागणी यामुळे अखेर पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट ओढावले आहे. राज्य सरकारच्या आदेशानंतर पुणे महापालिका प्रशासनाने शहरातील पाणीपुरवठ्यावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. येत्या गुरुवार १५ ऑक्टोबरपासून याची अंमलबजावी केली जाणार आहे. येत्या गुरुवारपासून आठवड्यातून एक दिवस शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांच्या दैनंदिन पाणी नियोजनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने पाऊस कमी पडण्याची शक्यता व्यक्त केली असून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यामध्ये राज्य सरकारने सर्व स्थानिक संस्थांनी पाणीपुरवठ्यामध्ये १० टक्के कपात करण्याचे आदेश दिले होते. महापालिका आयुक्त नवल किशोर राम तसेच अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर परदेश दौऱ्यावर असल्याने त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून यावर निर्णय घेतला जात नव्हता.राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार पुणे महापालिकेने पाण्यात ४० टक्के कपात करावी, असे पत्र शुक्रवारीच पाटबंधारे विभागाने महापालिकेला पाठविले होते.

पाटबंधारे विभागाने पुणे महापालिकेला तब्बल ४० टक्के पाणी कपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात थेट कपात केल्यास शहरातील पाणीपुरवठ्याचे गणित पूर्णपणे कोलमडण्याची आणि नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने एकाच वेळी मोठी कपात करण्याऐवजी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा पर्याय स्वीकारला आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कौर यांनी येत्या गुरुवापासून एक दिवस पाणी बंद राहणार असल्याचे सोमवारी जाहीर केले. धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा, शहराची वाढती लोकसंख्या, वाढती पाण्याची मागणी आणि आगामी काळातील पाण्याची गरज लक्षात घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मात्र, दुसरीकडे शहरातील पाणीगळती, अनधिकृत नळजोड आणि पाणी वितरणातील असमतोल यावर ठोस उपाययोजना करण्याचे आव्हानही महापालिकेसमोर आहे. पुणे शहराचा विस्तार झपाट्याने होत असताना पाणीपुरवठ्याची यंत्रणा मात्र त्याच वेगाने सक्षम झाली आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. एका बाजूला नव्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामे आणि वाढती लोकसंख्या, तर दुसऱ्या बाजूला उपलब्ध पाण्यावर मर्यादा, अशी कोंडी निर्माण झाली आहे.

आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनासाठी तात्पुरता दिलासा देणारा असला, तरी नागरिकांसाठी तो मोठा त्रासदायक ठरणार आहे. पाणी बंद असलेल्या दिवशी नागरिकांना पिण्याचे पाणी, स्वयंपाक, स्वच्छता तसेच अन्य दैनंदिन गरजांसाठी आधीच नियोजन करावे लागणार आहे. विशेषतः झोपडपट्ट्या, उंच इमारती, उपनगर आणि टँकरवर अवलंबून असलेल्या भागांमध्ये या निर्णयाचा परिणाम अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.दरम्यान, ४० टक्के कपातीची तलवार आणि आठवड्यातून एक दिवस पाणीबंद, या दोन्ही पर्यायांमध्ये पुणेकरांचीच कोंडी होत आहे. पाण्याचे नियोजन चुकल्यास आगामी काळात कपातीचे दिवस वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे.