पुणे : पुण्याचा तडाका वाढत असल्याने पाण्याची मागणी वाढत चालली आहे. मार्च तसेच एप्रिल महिन्याच्या तुलनेत नागरिकांकडून पाण्याची मागणी वाढत असल्याने महापालिकेच्या टँकरच्या संख्येतही वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

शहरातील अनेक भागात अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचे तक्रारी वाढत असतानाच महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच शहरातील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे कामगार दिनाच्या सुट्टीचा घरी बसून आनंद घेताना नागरिकांना विस्कळीत पाणीपुरवठ्याचा त्रास देखील सहन करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

खडकवासला ते  वारजे येथे येणाऱ्या १६०० मिलीमीटर व्यासाची रॉवॉटर रायझिंग मुख्य जलवाहिनी ड्रेनेज विभागाच्या (जायका) कामात गळती (लिकेज) होत आहे.  त्यामुळे वारजे जलशुद्धीकरण केंद्र २ चे पंपिंग बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे.

परिणामी आज (शुक्रवारी)  १ मे रोजी कोथरूड कर्वेनगर वारजे या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. शुक्रवारी पाणीपुरवठा कमी अधिक प्रमाणात होणार असल्याने या परिसरातील अनेक भागात कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

वारजे जलशुद्धीकरण केंद्र बंद राहणार असल्याने कोथरूड, कर्वेनगर, वारजे , बावधन, पाषाण, सुस, बाणेर, बालेवाडी बोपोडी आणि परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. पाणीपुरवठा जलवाहिनी मध्ये होणारी गळती थांबवण्यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या वतीने काम हाती घेतले जाणार आहे. परिणामी कोथरूड बालेवाडी बाणेर, कर्वेनगर या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्र तसेच पंपिंग स्टेशन आणि इतर जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी गेल्या आठवड्यात गुरुवारी पाणीपुरवठा विभागाने संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला होता. शुक्रवारी (२४ एप्रिल) ला सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी येईल असे महापालिकेने स्पष्ट केले होते. मात्र  काम करण्यास उशीर झाल्याने शुक्रवारी शहरातील अनेक भागात पाण्याचा एकही थेंब न आल्याने नागरिक त्रस्त झाले होते.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जवळपास ३० ठिकाणी शहरात  दुरुस्तीची कामे या दिवशी केली होती.  त्यामुळे सर्व छोट्या मोठ्या जलवाहिनी रिकाम्या होत्या. त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी तब्बल तीन दिवसांचा कालावधी दिला होता. त्यातच आता जलवाहिनीतील गळतीमुळे वारजे जलशुद्धीकरण केंद्रातून आणि पुरवठा होणाऱ्या भागातील पाणी बंद राहणार असल्याने सलग दुसऱ्या आठवड्यात या भागातील नागरिकांना शुक्रवारी पाणी मिळणार नसल्याचे समोर आले आहे.