पुणे : ‘राज्यात पर्जन्यमानात झालेली घट लक्षात घेता दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून येत्या १६ ऑक्टोबरपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी १० टक्के पाणीकपात सुरू करावी,’ असे आदेश राज्य सरकारने दिले आहे.

महापालिकेला मात्र अद्यापपर्यंत हे आदेश मिळालेले नाहीत. हे आदेश आल्यानंतर महापालिका आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांसमोर सादरीकरण करून त्यांच्या आदेशानंतर पाणीकपातीचा निर्णय घेतला जाईल, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, राज्य सरकारच्या आदेशानुसार १० टक्के पाणीकपात लागू करायची झाल्यास प्रत्येक आठवड्यात एक दिवस पाणीकपात करून हे शक्य होईल. यामुळे पुढील जून २०२७ पर्यंत ४० दिवसांचे पाणी वाचेल, असे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. हवामान खात्याने यंदाच्या वर्षी ‘एल निनो’च्या प्रभावामुळे राज्यात यंदा पर्जन्यमानात घट होणार असल्याचा इशारा दिला आहे.

या प्रभावामुळे राज्यातील अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंतचे पाण्याचे धरणनिहाय व वापरनिहाय अत्यंत सूक्ष्म नियोजन केले आहे. जलसंपदा विभागाने मंजूर केलेल्या कोट्यानुसार महापालिका पाणी घेत असून, त्यानुसार प्रत्येक भागांत पाणीपुरवठा केला जात आहे. सद्य:स्थितीत महापालिका दररोज १७५० एमएलडी पाणी धरणातून उचलते. यामध्ये १० टक्के कपात करायची झाल्यास दररोज १७५ एमएलडी कमी पाणी घ्यावे लागणार आहे.

दरम्यान, महापालिकेला अद्याप पाणीकपातीचे कोणतेही आदेश आले नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी सांगितले. राज्य सरकारने १० टक्के पाणीकपात करण्याचे आदेश दिल्यास त्याची अंलमबजावणी करण्यासाठी महापालिका आयुक्त तसेच महापालिकेचे महापौर, विरोधी पक्षनेते, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष यांच्यासह पक्षनेते यांच्या बैठकीत प्रस्ताव मांडून वस्तुस्थिती ठेवली जाईल.

त्यानंतर शहरात पाणीकपात लागू करायची की नाही, या बाबत निर्णय होईल, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख जगताप यांनी सांगितले. आठवड्यातून एक दिवस पाणीकपात केल्यास पुढील दहा महिन्यांमध्ये ४० दिवसांचे पाणी वाचेल, असेही त्यांनी सांगितले.

महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकुमार जगताप म्हणाले, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातून महापालिका ठरवून दिलेल्या कोट्यानुसार पाणी उचलून त्याचे वाटप करते. पाणीकपातीबाबतचे आदेश राज्य सरकारकडून आल्यानंतर पदाधिकाऱ्यांसमोर संपूर्ण माहिती मांडून त्यांच्या मान्यतेनंतर किती टक्के पाणीकपात करायची, यावर शिक्कामोर्तब होईल. मात्र अद्याप कपातीचे कोणतेही आदेश आलेले नाहीत.