पुणे : ‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमानात घट झाली असून, त्याचा परिणाम पुढील वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दर गुरुवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा आणि वाढत असलेली पाण्याची मागणी यांचे नियोजन करण्यासाठी पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट ओढावले आहे.

राज्य सरकारच्या आदेशानंतर पुणे महापालिका प्रशासनाने शहरातील पाणीपुरवठ्यावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या गुरुवारी (१५ ऑक्टोबरपासून) त्याची अंमलबजावी केली जाणार दर गुरुवारी संपूर्ण दिवस शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी केवळ एक दिवस पाणी बंद ठेवले जाणार असले तरी प्रत्यक्षात त्याचा फटका तीन दिवस बसणार आहे. गुरुवारी संपूर्ण दिवस शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तसेच शनिवारी देखील होणार आहे. म्हणजे एक दिवसाच्या पाणीकपातीचा परिणाम पुणेकरांच्या पाण्यावर तीन दिवस होणार आहे.

राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने वापर करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी किमान १० टक्के पाणी कपात करावी, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच, पुढील काळात धरणातील उपलब्ध पाण्याच्या साठ्यानुसार आवश्यकतेनुसार ही कपात वाढविण्याचे आदेशदेखील दिले आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासनाने आढावा घेऊन आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीचा निर्णय घेतला, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी प्रत्येक गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे आदेश काढले आहेत.

खडकवासला धरण साखळीमध्ये सध्या २६.२२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा मागील वर्षांच्या तुलनेत कमी आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमधील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे अतिरिक्त आयुक्त कौर यांनी सांगितले.

अतिरिक्त आयुक्त कौर म्हणाल्या, हवामान खात्याने पाऊस कमी पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. धरणातील उपलब्ध पाणी अधिक काळ पिण्यासाठी उपलब्ध व्हावे यासाठी दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पिण्याचे पाणी बांधकामांसाठी वापरण्यास बंदी

‘नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरू नये,’ असे आदेश महापालिकेने दिले असून, बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरल्यास संबधितांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. घरातील आणि सार्वजनिक ठिकाणच्या नळांमधील गळती तातडीने दुरुस्त करावी, असे आवाहन देखील महापालिकेने केले आहे.

येथे नोंदवा तक्रार

पाणीबचतीसाठी आवश्यक ती उपाययोजना महापालिकेकडून केली जाणार आहे. महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला असल्याने पाणीपुरवठ्याबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी पीएमसी केअर कॉल सेंटर १८००१०३०२२२, व्हॉट्स अप क्रमांक ९६८९९००००२ किंवा पीएमसी केअर ॲपवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.