Pune Water Cut on Thursday: पर्वती जलशुद्धीकरण केंद्राबरोबरच शहर आणि समाविष्ट गावातील जलशुद्धीकरण केंद्र आणि साठवणूक टाक्यांची आवश्यक देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्यामुळे बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी रात्री (१६ एप्रिल) बारा वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

दुसऱ्या दिवशी म्हणजे, शुक्रवारी (१७ एप्रिल) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

नवीन आणि जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, राजीव गांधी पंपिंग स्टेशन, लष्कर, वारजे, वडगाव जलशुद्धीकरण केंद्र आणि त्याअंतर्गत चांदणी चौक, गांधी भवन, पॅनकार्ड क्लब टाकी परिसर, शिवणे इंडस्ट्रीज परिसार, एसएनडीटी, चतु:श्रृंगी पाटी परिसर, होळकर जलकेंद्र, खडकवासला जॅकवेल, भामा-आसखेड जलकेंद्र येथे ही कामे करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पाणीपुरवठा विभागाने केले आहे.