पुणे : शहरात दहा टक्के पाणीकपातीनुसार आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत असला, तरी महापालिकेकडून कपातीमध्येही पाण्याची उचल नेहमीप्रमाणे किंवा त्यापेक्षा जास्त असल्याचे आकडेवारीवरून पुढे आले आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत त्या बाबतची आकडेवारीच सादर करण्यात आली. त्यामुळे कपातीमध्येही पाणी उचल नेहमी प्रमाणेच असताना हे पाणी मुरले कुठे, असा प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून मासिक दीड टीएमसी पाणी खडकवासला धरण साखळी प्रकल्पातून घेतले जाते. यंदा ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी सरसकट दहा टक्के कपात करावी आणि ऑगस्टअखेरपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे, असे आदेश जलसंपदा विभागाने दिले. त्यानुसार १५ ऑक्टोबरपासून महापालिकेने आठवड्यातील दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान, महापालिकेने २० टक्क्यांपर्यंत पाणीकपात करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महापालिकेला केली होती. मात्र, तूर्त आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद असातनाही महापालिकेडून नेहमीप्रमाणेच पाण्याची उचल होत असल्याची बाब जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निदर्शनास आणून दिली.
महापालिकेने जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत वापर दीड टीएमसीपेक्षा जास्त होता. सप्टेंबरमध्ये तो १.९४ टीएमसीपर्यंत पोहोचला. तर, पाणीकपात करण्यात आलेल्या ऑक्टोबरमधील पाणीवापर सुमारे १.६० टीएमसी असल्याची आकडेवारी जलसंपदा विभागाकडून बैठकीत देण्यात आली. त्यामुळे कपातीमध्येही पाणी उचल नेहमीप्रमाणे असताना हे पाणी मुरले कुठे, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्यापैकी १३ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा ऑगस्ट अखेरपर्यंत शहरासाठी दिला जाणार आहे. तर, दौंड शहराला सुमारे ३ टीएमसी पाणी देण्यात येणार आहे. बाष्पीभवनातून ३ टीएमसी पाणी वाया जाईल, असे गृहित धरण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित पाण्याबाबत परिस्थितीचा अंदाज घेऊन जानेवारीत होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचे या वेळी ठरले.
महिना – वापर (टीएमसीमध्ये)
जुलै – १.६५
ऑगस्ट – १.७०
सप्टेंबर – १.९४
ऑक्टोबर – १.६०
