पुणे : यंदाच्या वर्षी पावसाला उशिरा सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने धरणात उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. महापालिकेला मंजूर असलेला पाण्याचा साठा अधिकाधिक काळ टिकावा, यासाठी आठवड्यातून एक दिवस किंवा दिवसाआड पाणीकपात केल्यास किती पाण्याची बचत होईल, याचा सविस्तर प्रस्ताव तयार करून हे दोन्ही प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे.

महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘पाणीकपात करायची झाल्यास त्या बाबतचा निर्णय तातडीने घेणे अशक्य आहे. त्यामुळे याचे नियोजन सुरू करण्यात आले असून, दोन प्रस्ताव तयार करून ते आयुक्तांकडे पाठविले जाणार आहेत. आयुक्तांच्या आदेशानंतर महापालिकेतील लोकप्रतिनिधींसमोर वस्तुस्थिती मांडून सर्वसाधारण सभेत या बाबतचा अंतिम निर्णय होईल.’

यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ३१ ऑगस्टपर्यंत राखीव ठेवण्याची सूचना उपमुख्यमंत्री, पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जलसंपदा विभागाला केली आहे. तसेच, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीदेखील स्पष्ट सूचना जलसंपदा विभागाला दिल्या आहेत. पावसाळा सुरू होईपर्यंत पाण्याची गरज भागविण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुढील काही महिने १५ टक्के पाणीकपात करावी, अशी नोटीस जलसंपदा विभागाने महापालिकेला बजाविली आहे.

महापालिकेला नोटीस देण्यात आल्यानंतर त्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. ‘कितीही नोटीस आल्या तरी पुणेकरांचा एक थेंब देखील कमी होऊ देणार नाही,’ अशी भूमिका स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी घेतली आहे. तर पाण्याचे नियोजन करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे सुतोवाच महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केले आहेत.

पुणे शहराला खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका प्रतिदिन १ हजार ५६० दशलक्ष लिटर पाणी धरणांतून घेते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात पाण्याचा साठा काही प्रमाणात अधिक आहे. मात्र, पावसाळा उशिरा सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने त्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाकडून केले जात आहे.

महापालिकेने आठवड्यातील एक दिवस पाणी बंद ठेवल्यास सर्वसाधारणपणे १० टक्के पाण्याची बचत होईल. तर, दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केल्यास २५ टक्के पाण्याची बचत होणार आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रस्ताव तयार करून महापालिका आयुक्तांकडे पाठविले जाणार आहेत.

‘दिवसाआड पाणी दिल्यास आणि आठवड्यातून एकदा पाणी बंद ठेवल्यास नक्की किती पाणी वाचेल. त्यामध्ये काय अडचणी येऊ शकतात. याची सविस्तर माहिती दिली जाणार आहे,’ असे जगताप यांनी सांगितले. ‘या प्रस्तावावर आयुक्त सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी तसेच महापालिकेतील पदाधिकारी यांच्याशी चर्चा करतील आणि त्यानंतरच त्यावर शिक्कामोर्तब होईल,’ असेही जगताप यांनी सांगितले.

नंदकिशोर जगताप म्हणाले, आठवड्यात एक दिवस संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवल्यास महिन्याला चार दिवसांचे पाणी वाचेल. पुढील तीन महिन्यांमध्ये १२ दिवसांचे पाणी वाचेल. यामध्ये १० टक्के पाण्याची बचत होईल. तर दिवसाआड पाणी दिल्यास २५ टक्के पाण्याची बचत होईल.