पुणे : पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दहा टक्के पाणीकपात करावी, असे आदेश जलसंपदा विभागाने दिले आहेत. पिण्यासाठी, औद्योगिक वापरासाठी आणि महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ आणि अन्य संस्थांच्या चारा कार्यक्रमासाठी पाण्याची गरज भागल्यानंतरच रब्बी हंगामासाठी पाणी द्यावे, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील रब्बी हंगामासाठी सुरू असलेले आवर्तन बंद होण्याची शक्यता आहे. मात्र, या संदर्भातील पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, आवर्तन बंद करायचे की सुरू ठेवायचे, याचा निर्णय त्यांच्या हाती असणार आहे.
जिल्ह्याच्या काही भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सिंचनासाठी २५ सप्टेंबरपासून कालव्यातून आवर्तन सोडण्यात सुरुवात करण्यात आली आहे. आवर्तन सुरू झाल्यापासून ४५ दिवस कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडले जाणार आहे. रब्बी हंगामासाठी दर वर्षी खडकवासला धरणाच्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी दिले जाते. त्या संदर्भातील निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेतला जातो. मात्र, ऑक्टोबर महिन्यात होणारी ही बैठकही लांबणीवर पडली आहे.
मात्र, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या परवानगीने जलसंपदा विभागाने शेतीसाठी पाणी देण्याचे नियोजन केले. मात्र, जलसंपदा विभागानेच ‘एल-निनो’च्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर येत्या ३१ ऑगस्टपर्यंत धरणातील पाणी पुरविण्यासाठीचे नियोजन करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रब्बी हंगामासाठीचे आवर्तनाला शेवटचे प्राधान्य देण्यात आले आहे.
पिण्यासाठीचे, औद्योगिक वापरासाठी आवश्यक पाण्याची गरज भागल्यानंतरच धरणात पाणी शिल्लक असेल, तर ते रब्बी हंगामासाठी द्यावे, असे जलसंपदा विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. औद्योगिक क्षेत्रातील वापरासाठी ३० टक्के पाण्याचा पुनर्वापर करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. धरणे, नद्या आणि कालव्यातून होणाऱ्या अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी संयुक्त पथकेही स्थापन करण्यात येणार आहेत.
दरम्यान, पाणी वापराचे नियोजन करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे.
त्यामध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिक आयुक्त, जिल्हा मृद आणि जलसंधारण अधिकारी सदस्य असणार आहेत. सिंचनासाठी कालव्यातून पाणी द्यायचे की नाही, हे ही समिती निश्चित करणार आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या कालव्यातील पाण्याचा निर्णय राज्याच्या उपमुख्यमंत्री, पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हाती असणार आहे.
कालव्यातून दोन जिल्ह्यांत पाणी दिले जाणार असेल, तर त्याचा निर्णय जलसंपदा मंत्री घेणार असून, एका जिल्ह्यापुरता पाण्याचा निर्णय असेल, तर तो पालकमंत्री घेतील. त्यानुसार येत्या काही दिवसांमध्ये त्या बाबतचा निर्णय होईल. प्रवीण कोल्हे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग
