पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील घटता पाणीसाठा आणि यंदा पाऊस कमी होण्याची शक्यता असल्याने पाणीकपातीच्या निर्णयावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. पाणीकपात करण्यासंदर्भातील सूचना महापौर मंजुषा नागपूरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या असून पुढील सोमवारपासून (१५ जून) शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन प्रशासानकडून करण्यात आले आहे. दरम्यान, पाणीकपातीचे वेळापत्रक आणि आवश्यक ते नियोजनाबरोबरच वाॅशिंग सेंटर, जलतरण तलाव बंद करण्यात येणार असून यासंदर्भातील परिपत्रक येत्या दोन दिवसांमध्ये जाहीर केले जाणार आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पाणीसाठा सध्या ५ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा आहे. पाणीसाठ घटत असल्यामुळे शहरावर पाणीकपातीचे संकट होते. यासंदर्भात महापौर मंजुषा नागपूरे यांनी सोमवारी महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, सभागृहनेते गणेश बीडकर, विरोधी पक्षनेते नीलेश निकम, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यावेळी उपस्थित होते. या बैठकीतील निर्णयांची माहिती महापौर नागपूरे आणि आयुक्त राम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘शहराच्या पाणीपुरवठ्यात येत्या काही दिवसांमध्ये कपात करावी लागणार आहे. त्यादृष्टीने वेळापत्रक आणि योग्य ते नियोजन करण्याची सूचना प्रशासनाला करण्यात आली आहे. या बैठकीत पाणीकपातीचा निर्णायावर चर्चा झाली. प्रशासनाला तयारीसाठी काही अवधी लागणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाला वेळ देण्यात आला असून त्यांच्याकडून पुढील आठवड्यापासून पाणीकपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी होईल, असे’ नागपूरे यांनी सांगितले.
शहराला दैनंदिन पाणीपुरवठा करण्यासाठी १ हजार ५०० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. यंदा पाऊस उशिराने सुरू होणार असून पर्जन्यमान कमी होणार असल्याचा अंदाज असल्यामुळे धरणातील उपलब्ध पाणीसाठा जुलैऐवजी ३१ ऑगस्ट अखेरपर्यंत राखीव ठेवण्याची सूचना राज्य शासनाने महापालिकेला केली आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यापैकी तीन टीएमसी पाणी शहरासाठी मिळणार आहे. मात्र पाऊस उशिरा सुरू होणार असल्याबरोबरच तो कमी होणार असल्यामुळे पाणीकपातीची अपरिहार्यता निर्माण झाली आहे, असे राम यांनी सांगितले.
धरणांतील पाणीसाठा घटत असल्यामुळे पाणी काटकसरीने वापरण्यात यावे. पाणीबतीसाठी शहरात अभियानही राबविले जाणार असून प्रशानसाकडून पाणीकपातीचा अहवाल येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये दिला जाणार आहे. त्यानंतर पाणीकपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी होईल. – मंजुषा नागपूरे, महापौर, पुणे महापालिका.
खडकवासला धरणातील उपलब्ध पाणीसाठा
- खडकवासला : ०.८४ टीएमसी
- पानशेत : २.२७ टीएमसी
- वरसगाव : १.९० टीएमसी
- टेमघर : ०० टीएमसी
