पुणे : पाणी बचतीसाठी शहरात दिवसाआड पाणीपुरवठ्यानंतर आता महापालिकेने पाण्याचा अपव्यय करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने खडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुणे शहर आणि परिसरात पाणीकपातीच्या काळात पिण्याचे पाणी ‘वॉशिंग सेंटर’ आणि जलतरण तलावांवर वापरता येणार नसून, त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हा इशारा दिला. दरम्यान, शहराला सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला असून, पहिल्या दिवशी पाणी मिळाले नसल्याच्या तक्रारी फारशा आल्या नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

‘नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पथके तयार केली जात आहेत. पुढील चार दिवसांत ही पथके शहरातील विविध भागांत फिरतील, पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करतील,’ असे अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी सांगितले. 

सामान्य प्रशासन विभागाने पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता व उपअभियंता पदावरील अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या केल्या आहेत. यामध्ये पाणी पुरवठा विभागातील १२ जणांचा समावेश होता. पाणीपुरवठा करताना तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नये यासाठी बदली झालेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर पाणीपुरवठा विभागाचाही अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर म्हणाल्या, शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या निर्णयाची सोमवारपासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. नागरिकांच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून, अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

‘पावसाला विलंब झाल्यास पाणीकपात सुरूच’

‘यंदा २० जूनपर्यंत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पाऊस झाल्यास पाणीकपातीचे संकट टळेल. मात्र, पावसाला आणखी विलंब झाल्यास किंवा कमी पाऊस झाल्यास पुढील वर्षभर दिवसाआड पाणीपुरवठा दिवसाआड करावा लागेल,’ असे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

विश्रांतवाडी भागातील पाणी येत्या गुरुवारी बंद

विश्रांतवाडी परिसरातील जलवाहिनी हलविण्याचे काम महापालिकेच्या वतीने केले जाणार आहे. या कामामुळे येत्या गुरुवारी (१८ जूनला) येरवडा, विश्रांतवाडी आणि परिसरामधील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने ही माहिती दिली. 

महापालिकेच्या वतीने विश्रांतवाडी चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपूल, समतल विलगकाचे (ग्रेड सेप्रेटर) काम सध्या सुरू आहे. या कामास अडथळा ठरणारी पाणीपुरवठा विभागाची ६०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी स्थलांतरित केली जाणार आहे. यासाठी गुरुवारी विमाननगर, विश्रांतवाडीसह कळस, गणेशनगर, म्हस्के वस्ती, जाधव वस्ती, माळवाडी, वडारवाडी, संजय पार्क, बर्माशेल, विश्रांतवाडी विमानतळ रस्त्याचा काही भाग, नगर रस्त्यावरील श्रीपार्क या परिसरात पाणी पुरवठा होणार नाही. 

या कामामुळे या भागात १७ व १९ जून रोजी संपूर्ण भागात नेहमीप्रमाणे महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा होणार आहे. २० जूनपासून पुन्हा सम आणि विषम तारखेनुसार पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती लष्कर पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी अधीक्षक अभियंता वीरेंद्र केळकर यांनी दिली.