पुणे : उन्हाळा वाढत असल्याने नागरिकांकडून पाण्याची मागणी वाढत चालली आहे. त्यातच यंदाच्या वर्षी कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे धरणातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करून हे पाणी अधिक दिवस कसे वापरता येईल, याची चाचपणी करण्यास महापालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. कडक उन्हाळ्यामुळे बाष्पीभवन होऊन पाणी कमी होत आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या साखळीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी अर्धा दशलक्ष घनफूट (टीएमसी) पाणीसाठा अधिक शिल्लक असल्यामुळे शहरात तूर्तास पाणीकपात होणार नसली, तरी हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन पुढील नियोजन केले जाईल, असे पुणे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत गेल्या वर्षी १ जून रोजी ५.६४ टीएमसी पाणी शिल्लक होते. तर, यंदा हा साठा ६ टीएमसी आहे. त्यामुळे शहरात सध्या तरी पाणीकपात होणार नाही. मात्र, धरणांमध्ये सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा अधिक काळ टिकवण्यासाठी पाणीकपातीचा पर्याय गांभीर्याने विचाराधीन असल्याचे संकेत महापालिका प्रशासनाकडून देण्यात येत आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेले शहरीकरण, गगनचुंबी इमारतींचे वाढत असलेले जाळे, दर वर्षी वाढणारी लोकसंख्या आणि त्या तुलनेत न वाढणारे जलस्रोत यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे उपलब्ध पाणीसाठा आणि वापर यामधील ताळमेळ बिघडत चालला आहे. शहराची पाण्याची गरज दरमहा सुमारे १.५ ते १.६५ टीएमसी इतकी आहे. यंदा ‘एल निनो’च्या संभाव्य परिणामांमुळे पाऊस कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

ही बाब लक्षात घेऊन धरणातील उपलब्ध पाणी ऑगस्टपर्यंत पुरविण्यासाठी महापालिकेने पाणीवापरावर नियंत्रण ठेवावे, अशी सूचना जलसंपदा विभागाने गेल्या महिन्यात महापालिकेला केली होती. शहरात पाणीकपात न करण्याचा निर्णय महापालिकेने तेव्हा घेतला होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात धरणांतील साठा, पावसाचा अंदाज आणि प्रत्यक्ष पर्जन्यमान यांचा आढावा घेऊन पाणीकपातीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप म्हणाले, धरणात पाणीसाठा असल्याने पुणेकरांना नियमित पाणीपुरवठा केला जात आहे. ज्या भागात पाणीपुरवठा करण्यास अडचण येते. तेथे टँकरद्वारे पाणी दिले जाते. या वर्षी टँकरची मागणी ५० ने वाढली असून नियोजनबद्ध पद्धतीने पाणीपुरवठा महापालिकेकडून केला जात आहे. हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन पुढील नियोजन केले जाईल.