पुणे : पुणे शहराचा गेल्या काही वर्षांमध्ये वाढत असलेला विस्तारामुळे शहरातील लोकसंख्या वाढत चालली आहे. परिणामी पाण्याची मागणीही वाढत आहे. पुण्याची पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत असतानाच वितरण व्यवस्थेतील गळती महापालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे.
शहराच्या पाणी वितरणातील गळतीमुळे तब्बल ५२२.१९ दशलक्ष लिटर पाणी दररोज वाया जाते. शहराची दैनंदिन पाण्याची गरज १,११०.१८ दशलक्ष लिटर असून गळतीचा विचार केल्यास ही गरज तब्बल १,६३१.८४ दशलक्ष लिटरवर जात असल्याचे पुणे महापालिकेच्या पर्यावरण सद्यःस्थिती अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
पुणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने चालू वर्षाचा (२०२५-२६) पर्यावरण सद्यःस्थिती अहवाल तयार करून तो मान्यतेसाठी महापालिकेच्या मुख्य सभेसमोर ठेवला आहे. या अहवालामध्ये अनेक बाबींकडे लक्ष वेधण्यात आले असून त्याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यकाळात पुणेकरांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे याची जाणीव करून देण्यात आली आहे.
शहराची पाण्याची गरज २१.०३ टीएमसी इतकी आहे. मात्र प्रत्यक्षात शहराला सध्या १६.३६ टीएमसी इतकाच अधिकृत पाणी कोटा मंजूर आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी पाणीगळती रोखणे हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.पाणीगळती कमी करणे तसेच जलस्रोतांचे दीर्घकालीन संरक्षण करण्याची आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पाण्याची आकडेवारी
पाण्याची दैनंदिन गरज : १,११०.१८ दशलक्ष लिटर
गळतीमुळे नुकसान : ५२२.१९ दशलक्ष लिटर प्रतिदिन
गळतीसह दैनंदिन गरज : १,६३१.८४ दशलक्ष लिटर
वार्षिक गरज : २१.०३ टीएमसी
सध्या मंजूर पाणी कोटा : १६.३६ टीएमसी
कोट्यवधींचे प्रकल्प, पण जलप्रदूषण कायम
पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीसह प्रमुख जलस्रोतांच्या पाण्याच्या गुणवत्तेत गेल्या काही वर्षांमध्ये मोठी घसरण झाल्याचे पर्यावरण सद्यःस्थिती अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. मुळा-मुठा नदीसह शहरातील पाषाण तलाव, कात्रज तलाव आणि कात्रज राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील जलाशयांच्या पाण्याच्या गुणवत्तेत ऱ्हास झाल्याचे अहवाल म्हटले आहे.
नदी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेकडून मुळा-मुठा प्रदूषण निर्मूलन प्रकल्प राबविला जात असून या प्रकल्पाला ९९०.२६ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मात्र, मोठ्या आर्थिक गुंतवणुकीनंतरही नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा होण्याऐवजी गुणवत्ता ढासळत आहे. नदीच्या पाण्यातील एकूण घनपदार्थांचे प्रमाणही ऋतूनुसार मोठ्या प्रमाणात बदलते. यामुळे महापालिकेच्या नदी संवर्धनाच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पुण्याला पुन्हा पुराचा धोका ?
पुणे शहरातील नदीकाठच्या भागांना पूरस्थितीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आखलेल्या पूरनियंत्रण व्यवस्थेतील सतर्कता आणि धोक्याच्या पातळीचे आकडे पर्यावरण अहवालामध्ये देण्यात आले आहेत. नदीच्या काठी होत असलेली बेकायदा बांधकामे, ओढे, नाल्यांमध्ये टाकण्यात आलेले भराव यामुळे पाणी वाहून जाताना अनेक अडथळे येत असल्याचे अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. खडकवासला धरण ते मुळा-मुठा संगम या मुठा नदीच्या पट्ट्यासाठी ६० हजार क्युसेक ही सतर्कता पातळी, तर एक लाख क्युसेक ही धोक्याची पातळी निश्चित करण्यात आली आहे.
शहरातील नदीपात्र, नदीकाठचा विकास, पूररेषा आणि वाढते नागरीकरण या पार्श्वभूमीवर पूरनियंत्रणाचे नियोजन केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीत उतरविण्याचे आव्हान महापालिकेसमोर असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे.
