पुणे : धरणातील पाणीसाठा कमी झाला असून, पावसाने दिलेली ओढ दिल्याने महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याबरोबरच आता शहरातील सार्वजनिक, खासगी जलतरण तलाव आणि वॉशिंग सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इमारतींच्या बांधकामांसाठी पिण्याचे पाणी वापरण्यास बंदी घालण्यात आली असून, कूपनलिकेचे पाणी वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. आदेशाचे पालन न केल्यास दोन वेळा दहा हजारांचा दंड, तर तिसऱ्यांदा संबंधितांविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे.
उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून महापालिकेने पाणी बचतीसाठी विविध उपाययोजन केल्या आहेत. त्यानुसार जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी आदेश काढले आहेत.
आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पहिल्यांदा पाण्याचा गैरवापर केल्यास दहा हजार रुपये, दुसऱ्यांदा नियमांचे पालन न केल्यास पुन्हा दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. तिसऱ्यांदा पाण्याचा गैरवापर केल्यास महापालिकेकडून फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी पाणीबचत करावी, यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांतील आरोग्य निरीक्षक, विभागीय आरोग्य निरीक्षक यांनी फिरत्या गाडीतून ध्वनिक्षेपणाद्वारे नागरिकांना पाणी कपातीचे आवाहन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिकेच्या सूचना
– आंघोळ, भांडी, कपडे धुवण्यासाठी आवश्यक तेवढ्याच पाण्याचा वापर करावा.
– वाहन धुवणे, अंगण किंवा पदपथ स्वच्छ करणे यासाठी कूपनलिका किंवा पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये.
– खासगी उद्यानांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर बंद करावा. पिण्याचे पाणी वापरल्यास दहा रुपये दंड आकारला जाणार आहे.
– खासगी सोसायट्यांमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) सुरू करून त्या पाण्याचा पुनर्वापर उद्यानांसाठी करावा.
– पाण्याच्या पाण्याच्या टाक्यांना ‘ऑटोमेटिक फ्लोट व्हॉल्व्ह’चा वापर करावा. टाकीतून पाणी वाहत असल्याचे आढळल्यास संबंधितांना दहा हजार रुपये दंड केला जाणार आहे.
– कोणत्याही बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरण्यात येऊ नये, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी), कूपनलिका, विहिरीचे पाणी वापरण्यात यावे. बांधकाम विभागांतील संबंधित अभियंता यांच्याकडून पाहणी केली जाणार आहे.
– बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरल्याचे आढळून आल्यास बांधकाम थांबवून संबंधितांना दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
– वाॅशिंग सेंटर सुरू केल्यास संबंंधितांकडून दहा हजार रुपये वसूल केले जाणार आहेत.
– अनधिकृत नळजोड आढळून आल्यास पाणीपुरवठा विभागाकडील कनिष्ठ अभियंत्यांकडून कारवाई केली जाणार आहे.
– महापालिकेच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या टँकरमधून पाण्याची गळती होत असल्याचे आढळल्यास संबंधित टँकर मालकाविरुद्ध दहा हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. – कोणत्याही रस्त्याच्या कामासाठी पिण्याचे पाणी वापरण्यात बंदी घालण्यात आली आहे.
