पुणे : पाणीपट्टी थकबाकीवरून शहराचे पाणी बंद करण्याचा इशारा जलसंपदा विभागाने दिल्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने २५ कोटी रुपये तातडीने जलसंपदा विभागाकडे जमा केले आहेत. त्यामुळे तूर्तास शहराचा पाणीपुरवठा बंद न करण्याची भूमिका जलसंपदा विभागाने घेतली असून महापालिकेने आत्तापर्यंत थकबाकीपोटी एकूण २५१ कोटी रुपये भरल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान, सिंचन, बिंगर सिंचनापोटीची एकूण ४४५.६७ कोटी रुपयांची पाणीपट्टी वसुली खडकवासला पाटबंधारे विभागाने केली असून, हा सर्वाधिक पाणीपट्टी वसूल करणारा हा राज्यातील एकमेव विभाग ठरला असल्याचा दावाही करण्यात आला आहे. महापालिका आणि जलसंपदा विभागात पाणीपट्टी बिलाच्या थकबाकीवरून अनेक वर्षांपासून वाद आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर थकबाकीची रक्कम तातडीने न भरल्यास शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा जलसंपदा विभागाने दिला होता. त्याबाबतची नोटीसही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला बजाविण्यात आली होती.
महापालिकेकडून नागरी वापरासाठी पाणी घेतले जाते. जलसंपदा विभागाबरोबर झालेल्या करारानुसार घरगुती आणि व्यावसायिक दराने पाण्याची देयके दिली जातात. मात्र, जलसंपदा विभाग औद्योगिक वापराच्या दराने पाणीपट्टीची देयके पाठवित आहे. तसेच, थकबाकीवर दहा टक्के दंडाची आकारणीही केली जात आहे, असा दावा करून या संदर्भात जल प्राधिकरणाकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे महपाालिकेने तक्रार केली होती.
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठक घेतील, असेही सांगितले जात होते. मात्र, महापालिकेकडून २५ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. त्याबरोबरच पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही २० कोटी रुपये थकबाकी पोटी जमा केले आहेत. महापालिकेकडे असलेल्या थकबाकीच्या रकमेपैकी एकूण २५१ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. त्यामध्ये एकूण दिलेल्या २०२ कोटी रुपयांचा आणि समायोजित ४९ कोटी रुपयांच्या रकमेचा समावेश आहे,’ अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली.
पुणे महापालिकेकडी पाणीपट्टी वसुली
एकूण रक्कम- २०२ कोटी
समायोजन केलेली रक्कम- ४९ कोटी
एकूण वसुली – २५१ कोटी
पिंपरी-चिंचवडकडील पाणीपट्टी वसुली – एकूण रक्कम – ५८.९० कोटी, चिंचवड, हिंजवडी, कुरकुंभ ‘एमआयडीसी’कडील वसुली – एकूण पाणीपट्टी वसुली- ५० कोटी खडकवासला पाटबंधारे विभागाककडील वार्षिक वसुली, सिंचन ४.०३ कोटी, बिगर सिंचन- ४४१.६४ कोटी एकूण – ४४५.६७ कोटी
पाणीबंदच्या इशाऱ्यानंतर पुणे महापालिकेने २५ कोटींची रक्कम थकबाकीपोटी भरली आहे. त्यामुळे तूर्तास पाणीपुरवठा बंद करण्यात येणार नाही. – किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग
