पुणे : धरणातील घटत्या पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर आज, सोमवारपासून (१५) जून एक दिवसाआड पाणीपुरठा होणार आहे. महापालिकेच्या नव्या नियोजनानुसार नागरिकांना पूर्वीच्याच वेळेत पाणी मिळणार असून, पाणीपुरवठा मात्र एक दिवसाआड होईल. शहरातील विविध जलकुंभ आणि त्याअंतर्गत येणाऱ्या भागांचे सम आणि विषम तारखांनुसार विभाजन करण्यात आले आहे.
त्यानुसार, कोथरूड, पर्वती, सहकारनगर, सिंहगड रस्त्याचा काही भाग, कात्रज, येरवडा-कल्याणीनगर, खराडी-वडागावशेरी या भागाला उद्या नव्या वेळापत्रकानुसार (विषम तारीख) पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील घटता पाणीसाठा आणि यंदा पाऊस कमी होण्याच्या शक्यता असल्यामुळे गेल्या आठवड्यातत महापालिकेने सोमवारपासून (१५ जून) पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला होता. महापौर मंजूषा नागपूरे यांनी तसे आदेश प्रशासनाला दिले होते. यंदा ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे पर्जन्यमानावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यताही आहे.
शहराला दैनंदिन पाणीपुरवठा करण्यासाठी १ हजार ६०० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. यंदा पाऊस उशिराने सुरू होणार असून, पर्जन्यमान कमी होणार असल्याचा अंदाज असल्यामुळे धरणातील उपलब्ध पाणीसाठा जुलैऐवजी ३१ ऑगस्ट अखेरपर्यंत राखीव ठेवण्याची सूचना राज्य सरकारने महापालिकेला केली आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यापैकी तीन टीएमसी पाणी शहरासाठी मिळणार आहे. मात्र, पाऊस उशिरा सुरू होणार असल्याबरोबरच तो कमी होणार असल्यामुळे पाणीकपात करण्यात आली आहे. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन महापौर नागपुरे यांच्यासह महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, वाॅशिंग सेंटर, जलतरण तलावांसह बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
सम आणि विषम तारखांचे नियोजन
पर्वती एलएलआर, एसएनडीटी, चतुःश्रृंगी, होळकर, विद्यापीठ, चांदणी चौक, बाणेर, म्हाळुंगे, वारजे-माळवाडी, रामनगर, कोंढवे धावडे, शिवणे, श्रीहरी, केदारेश्वर आणि धनकवडी परिसरातील नागरिकांना सम तारखांना पाणीपुरवठा केला जाईल. तर कोथरूड (लक्ष्मीनगर वगळता), बावधन, एरंडवणेचा काही भाग, संतोषनगर, आंबेगाव खुर्द, महादेवनगर, कात्रज गावठाण, सुखसागरनगर, बिबवेवाडी, लोअर इंदिरानगर, सेमिनरी हील आणि पर्वती दर्शन परिसरांना विषम तारखांना पाणी मिळेल.
या भागांमध्ये पूर्वीप्रमाणेच एक दिवसाआड पाणी
ज्या भागांमध्ये आधीपासूनच एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे, त्या भागांच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. फुरसुंगी, मांजरी, वाघोली, लोहगाव, खडकवासला, नांदोशी, किरकटवाडी आणि येवलेवाडी या भागांमध्ये पूर्ववत व्यवस्था कायम राहणार आहे.
विभागनिहाय सम-विषम तारखेला होणारा पाणीपुरवठा
विभागनिहाय सम-विषम तारखेला होणारा पाणीपुरवठा
| विभाग | तारीख |
| चतुःश्रृंगी | सम |
| एसएनडीटी (कोथरूड, बावधन) | विषम |
| एसएनडीटी (वारजे, शिवणे, उत्तमनगर) | सम |
| पर्वती (कात्रज, आंबेगाव, संतोषनगर) | विषम |
| पर्वती (धनकवडी, कोंढवा, बालाजीनगर) | सम |
| सिंहगड रस्ता (धायरी, वडगाव) | विषम |
| सिंहगड रस्ता (हिंगणे, माणिकबाग) | सम |
| बिबवेवाडी | विषम |
| पर्वती-सहकारनगर | विषम |
| दत्तवाडी-सिंहगड रस्ता विभाग | सम |
| स्वारगेट | सम |
| बंडगार्डन (खराडी, वडगाव शेरी) | विषम |
| बंडगार्डन (येरवडा परिसर) | सम |
| येरवडा-कल्याणीनगर | विषम |
| येरवडा | सम |
