पुणे : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे. उत्सवाची तयारी सुरू असताना शहरातील जलशुद्धीकरण केंद्रांची देखभाल दुरुस्तीची कामे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, भामा आसखेड जॅकवेल, वारजे जलशुद्धीकरण केंद्रांसह इतर काही केंद्रातील विद्युत, पंपिंग तसेच स्थापत्य विषयक देखभाल दुरुस्तीची कामे येत्या गुरुवारी (१० सप्टेंबरला) केली जाणार आहे.
या कामामुळे गुरुवारी शहरातील बहुतांश भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच यामुळे दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) ११ सप्टेंबरला सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी ही माहिती दिली.
देखभाल दुरुस्तीची कामे करणे आवश्यक असल्याने पाणीपुरवठा विभागाने याचे नियोजन केले आहे. बुधवारी मध्यरात्रीपासूनच काम सुरु होणार असल्याने गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जगताप यांनी केले आहे.
या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद :
पर्वती एचएलआर टाकी : सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनगर, शिवतेजनगर, अप्पर व लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी गावठाण, गंगाधाम, चिंतामणीनगर, लेक टाऊन, प्रेमनगर, सॅलेसबरी पार्क, पर्वती गावठाण, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कोंढवा खुर्द, साईबाबानगर, जनता वसाहत.
एसएनडीटी जलकेंद्र : गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ, विधी महाविद्यालय रस्ता, बाणेर रोडचा काही भाग, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, पौड रस्ता, मयूर कॉलनी, कर्वे रस्ता, वारजेचा काही भाग.
भामा आसखेड जलकेंद्र : कळस-धानोरी, लोहगाव, टिंगरेनगर, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, खराडी तसेच आळंदी नगर परिषद आणि लगतच्या परिसर
पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी : बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, पॅनकार्ड क्लब रोड, पल्लोड फार्म, मेडिपॉईंट रस्ता, वारजे जलकेंद्रालगतच्या जीएसआर टाकी परिसरातील कर्वेनगर, शाहू कॉलनी, इंगळेनगर, वारजे जकात नाका आणि परिसर
चांदणी चौक टाकी : पाषाण, बावधन, भुसारी कॉलनी, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, सुस रोड, भूगाव रोड परिसर, गांधी भवन, वारजे-माळवाडी, काकडे सिटी, कोथरूड, कर्वेनगर, हिंगणे, कॅनॉल रोड, चतुःशृंगी टाकीवरुन पाणीपुरवठा होणारा औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ परिसर, खडकी, आनंदपार्क, सानेवाडी, सकाळनगर, चव्हाणनगर, औंधगाव एनडीए रस्त्याचा काही भाग
लष्कर पाणीपुरवठा : लुल्लानगर, कोंढवा गावठाण, कौसरबाग, एनआयबीएम, साळुंखे विहार, वानवडी, आझादनगर, केदारीनगर, गंगा सॅटेलाइट सोसायटी, शिंदे छत्री, जगताप चौक.
वडगाव जलकेंद्र : दत्तनगर, टेल्को कॉलनी, संतोषनगर, आंबेगाव रस्ता, कात्रज, गुजरवाडी, सुखसागरनगर, कात्रज-कोंढवा रस्ता, गोकुळनगर, टिळेकरनगर, येवलेवाडी, कोंढवा, बालाजीनगर, सिंहगड रस्ता, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, धनकवडी, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द
