पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्यापैकी १३ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा ऑगस्ट अखेरपर्यंत शहरासाठी दिला जाणार आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत त्यासंदर्भातील निर्णय गुरुवारी घेण्यात आला. दरम्यान आवश्यकता भाससल्यास जानेवारी महिन्यात पुन्हा कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कालवा सल्लागार समितीची बैठक लांबणीवर पडली होती. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर गुरुवारी उपमुख्यमंत्री, पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. महापौर मंजूषा नागपूरे, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, सुनील शेळके, विजय शिवतारे, भीमराव तापकीर, ज्ञानेश्वर कटके, हेमंत रासने, सिद्धार्थ शिरोळे, बाबाजी काळे, शंकर जगताप, राहुल कुल, शंकर मांडेकर यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते. पिण्याचे आणि शेतीच्या पाणी नियोजनाबाबत आमदारांनी विविध मुद्दे मांडले.

‘एल-निनो’च्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पाणीकपात करावी, अशी सूचना जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महापालिकेला या बैठकीत केली. त्यावर पाणीकपातीसंदर्भात अधिकाऱ्यांबरोबर येत्या दोन दिवसांमध्ये बैठक घेतली जाईल आणि पाणीवापरावर काही निर्बंध घातले जातील, असे संकेत महापौर नागपुरे यांनी दिले. तर, पिण्याचे आणि शेतीसाठीचे पाण्याच्या नियोजनासाठी समन्वयाने काम करावे, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

‘पाणीवाटपामध्ये कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही. त्यासाठी योग्य नियोजन केले जाईल. पाणी वितरणाचे योग्य नियोजन करून शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली. येत्या ऑगस्ट अखेरपर्यंत शहरासाठी १३ टीएमसी पाणी दिले जाईल. मात्र, महापालिकेने पाणीकपात करावी, अशी सूचना केली जाईल. त्यानुसार महापालिकेकडून नियोजन केले जाईल,’ असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे, पाण्याचा पुनर्वापर, उपलब्ध पाण्याचे नियोजन आणि सर्व लाभधारकांना समान संधीने पाणी देण्याबाबतही चर्चा करण्यात आल्याचे विखे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

‘दहा टक्के पाणी राखीव’

‘पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी समन्वयाने काम करावे लागेल,’ अशी सूचना उपमुख्यंत्री सुनेत्रा पवार यांनी केली. ‘भविष्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे. त्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या नियोजनात दहा टक्के पाणी बफर म्हणून राखीव ठेवण्यात आले आहे. पुणे महापालिकेला १३ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून, त्या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना महापालिकेला करण्यात आली आहे. महापालिकेच्या प्रत्येक्ष क्षेत्रीय कार्यालयात स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येतील. पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही पाणी नियोजनाबाबत आवश्यक दक्षता घ्यावी,’ असे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.

शहराच्या पाणीपुरवठ्याच्या नियोजनाबाबत येत्या दोन दिवसांमध्ये महापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. त्यानुसार पाणीवापरावर काही निर्बंध घालण्याबाबत चर्चा करून निर्णय घेतले जातील. पुणेकरांनी आतापर्यंत महापालिकेला सहकार्य केले आहे. यापुढेही ते सहकार्य करतील. – मंजूषा नागपूरे, महापौर, पुणे महापालिका