पुणे : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याचा फटका पाणी नियोजनासाठी महत्त्वाच्या असलेल्या कालवा सल्लागार समितीला बसण्याची शक्यता आहे. आचारसंहितेमुळे ही बैठक लांबणीवर पडणार असल्यामुळे सिंचनासाठीचे आवर्तन आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन रखडणार आहे.

खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्याचे शहर, पिंपरी-चिंचवड, ग्रामीण भाग आणि शेतीसाठी किती आणि कोणत्या कालावधीत वाटप करायचे, या बाबत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत नियोजन केले जाते. पावसाळा संपल्यानंतर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक दर वर्षी ऑक्टोबर महिन्यात होते. त्यामध्ये सिंचनासाठी, पिण्यासाठीच्या पाण्याचे नियोजन केले जाते. मात्र, ही बैठक लांबणीवर पडण्याची शक्यता असल्यामुळे पाण्याच्या आवर्तनाचे वेळापत्रक, शेतीसाठी उपलब्ध पाणी आणि शहराच्या पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही त्याला दुजोरा देण्यात आला.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पुण्यासह राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान, तर २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीमुळे आचारसंहिताही लागू झाली आहे.

जलसंपदा विभागाच्या नियमानुसार कालवा सल्लागार समितीची बैठक प्रत्येक सिंचन हंगामापूर्वी घेणे अपेक्षित आहे. पाण्याचे वार्षिक नियोजन, गेल्या हंगामातील सिंचनाचे पुनरावलोकन, पाणी वापरातील अडचणी आणि लाभक्षेत्रातील पाण्याचे व्यवस्थापन यांसारख्या बाबींवर समितीत चर्चा केली जाते. तसेच, पाणीटंचाईच्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणाचा विचार करून विशेष बैठक घेण्याची तरतूद आहे.

शहर विरुद्ध शेती संघर्ष टाळण्याचे आव्हान

पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढती पाण्याची मागणी यामुळे खडकवासला प्रकल्पातील पाण्यावर शहरी पाणीपुरवठ्याचा दबाव वाढत आहे. दुसरीकडे हवेली, दौंड, इंदापूर आदी भागांतील शेती मोठ्या प्रमाणावर या प्रकल्पाच्या कालव्यांवर अवलंबून आहे. यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन करताना पिण्याचे पाणी, औद्योगिक वापर आणि सिंचन यांचा समतोल राखणे आवश्यक असते. कालवा सल्लागार समितीत विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि लाभधारक घटकांच्या सहभागातून या बाबींवर चर्चा होते. त्यामुळे बैठक लांबणीवर पडल्यामुळे अंतिम नियोजनाचा कालावधीही पुढे जाण्याची शक्यता आहे.

धरणांमध्ये साठा मुबलक; तरीही नियोजन आवश्यक

जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरली. मात्र, सप्टेंबरमध्ये पावसाने मोठी उघडीप दिल्याने आवक कमी झाली आहे. सध्या चारही धरणांत मिळून २८.२ टीएमसीएवढा पाणीसाठा आहे. धरणे भरली असली, तरी सप्टेंबरअखेरपासून पुढील पावसाळ्यापर्यंत उपलब्ध साठ्याचा काटेकोर वापर करणे आवश्यक आहे. जलसंपदा विभागाकडून शहर आणि ग्रामीण भागासाठी पाणी सोडणे सुरूच असल्याने साठ्यात हळूहळू घट होत आहे.

खरीप, रब्बीच्या आवर्तनांवर परिणाम?

पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील शेतीला कालव्याच्या आवर्तनांवर अवलंबून राहावे लागते. पाण्याचे आवर्तन कधी सोडायचे, किती दिवस सोडायचे आणि कोणत्या कालव्यांना प्राधान्य द्यायचे, याचे नियोजन वेळेत न झाल्यास शेतकऱ्यांना पिकांच्या नियोजनात अडचणी येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीही निवडणूक आचारसंहितेमुळे कालवा सल्लागार समितीची बैठक लांबली होती.