पुणे : पुणे शहराला लोकसंख्येच्या प्रमाणात आणि मापदंडानुसार पाणी दिले जावे आणि सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्पातून ग्रामीण भागातील शेतीसाठी प्रक्रिया केलेले पाणी द्यावे, या महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या (एमडब्ल्यूआरआरए) दिलेल्या आदेशाचे पालन होत नसल्यामुळे पुणे महापालिका आणि जलसंपदा विभागाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या वतीने विठ्ठल जराड यांनी ही याचिका दाखल केली.
महापालिकेकडून मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी वापर होत असून, पाणी बचतीचे कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे झालेल्या सुनावणीवेळी महापालिकेने लोकसंख्येच्या प्रमाणात आणि मापदंडानुसार पाणीवापर करावा, असे आदेश २३ ऑगस्ट २०१७ रोजी देण्यात आले होते. त्या आदेशाचीही अंमलबजावणी होत नसल्यामुळे जराड यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे दाद मागितली. त्यामध्ये महापालिकेला प्रतिवादी करण्यात आले होते.
त्यावर जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानेही मुख्य अभियंत्यांनी दिलेले आदेश कायम ठेवले. ‘प्राधिकरणाच्या आदेशाचेही पालन होत नसल्यामुळे भविष्यात ग्रामीण विरोधात शहरी भाग असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही जलसंपदा आणि महापालिका विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे,’ अशी माहिती विठ्ठल जराड यांनी दिली.
‘सध्याची परिस्थिती पाहता १० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. मात्र सध्या प्रतिदिन १५५० एमएलडी पाणीवापर होत आहे. हा पाणीवापर जास्त आहे. तसेच, मुंढवा जॅकवेलमधून प्रक्रिया केलेले पाणी शेतीसाठी देणे आवश्यक असताना प्रक्रिया न करताच पाणी दिले जात आहे. त्या बाबत जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वतीने महापालिका आणि जलसंपदा विभागाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे,’ असे जराड यांनी स्पष्ट केले.
