पुणे : पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात आलेल्या २०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी खडकवासला येथील केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्राची (सीडब्ल्यूपीआरएस) सुमारे २.५ हेक्टर जागा मिळण्याची शक्यता आहे. ही जागा जलशुद्धीकरण केंद्रासाठी देण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत.
ही जागा पुढील काही महिन्यांमध्ये पुणे महापालिकेला मिळण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर महापालिकेत समाविष्ट झालेल्या १६ गावांमधील अंदाजे १३ लाख नागरिकांना फायदा होणार आहे. या कामामुळे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावातील नागरिकांना महापालिकेच्या वतीने केला जाणारा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.
खडकवासला येथील केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्रामध्ये लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रादेशिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी खडकवासला येथील ‘सीडब्ल्यूपीआरएस’च्या सुमारे २.५ हेक्टर जागा २०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी वापरासाठी मिळावी, असा प्रस्ताव मांडला. ‘सीडब्ल्यूपीआरएस’चे संचालक सेल्वा बालन यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
‘महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या २०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे महापालिकेत समाविष्ट झालेल्या १६ गावांमधील अंदाजे १३ लाख नागरिकांना भविष्यातील पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठा लाभ होणार आहे. या भागातील वाढती लोकसंख्या, नागरीकरण आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे,’ असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
‘या प्रकल्पामुळे नव्याने समाविष्ट गावांमध्ये पुरेसा, नियमित, विश्वासार्ह आणि शाश्वत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यास मदत होणार आहे. २.५ हेक्टर जागा प्रस्तावित प्रकल्पासाठी वापर करण्यासाठी मिळालेला सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेता, पुढील प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया समन्वयाने राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वाढत्या पुणे शहरासाठी दीर्घकालीन नियोजन, पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.
या प्रकल्पाचा मोठा फायदा खडकवासला, नांदोशी , सणसनगर, किरकटवाडी , नांदेड, धायरी, नऱ्हे, भिलारेवाडी , मांगडेवाडी, निंबाळकरवाडी, कोळेवाडी, जांभुळवाडी, कोंढवे-धावडे, उत्तमनगर, शिवणे या गावांना होणार आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पामुळे समाविष्ट १६ गावातील सुमारे १३ लाख नागरिकांना सुरळीत आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होऊ शकतो. या भागातील नागरिकांसाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचाही विश्वास पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
