पुण्यात १८८२-८३ च्या सुमारास १२९० विहिरी आणि ८४ सार्वजनिक हौद होेते. त्यातून पुणेकरांची तहान भागवली जात असे, याची नोंद सरकारी गॅझेटिअरमध्ये आढळते. मात्र, जलसंपदा विभागाने त्यापुढे जाऊन नवीन शोध लावला आहे. पुणेकर विहिरी आणि कूपनलिका यांच्यामार्फत थोडेथोडके नव्हे; तर सुमारे पाच दशलक्ष घनफूट (टीएमसी) पाणी वापरतात. ते मोजण्यासाठी त्यांनी कोणती यंत्रणा वापरली, हे समजायला मार्ग नाही; पण पुण्यात अजूनही भरपूर विहिरी आहेत, हे जलसंपदा विभागामुळे पुणेकरांना उमजले असावे. आजवर धरणांतील पाण्याची पातळी मोजणारा जलसंपदा विभाग आता भूजल पातळीवर लक्ष ठेवून असावा. त्यामुळे त्यांना पुण्यात कूपनलिकांचे जाळे कसे पसरले आहे, हे ज्ञात झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाड्यांबरोबर विहिरीही बुजल्या असल्या, तरी पुण्यातील ठिकठिकाणी विहिरी नजरेस पडणाऱ्या जलसंपदा विभागाला उजवा मुठा कालव्याला लागून खोदलेल्या विहिरी आणि कालव्यातून पाझरणाऱ्या पाण्यावर बारमाही तुडुंब भरलेल्या विहिरी का दिसत नाहीत? त्या विहिरींतून टँकरने राजरोसपणे चोरल्या जाणाऱ्या पाण्याचा हिशेब कोणाच्या माथी मारायचा? असे मूलभूत प्रश्न पुणेकरांना आता पडल्याशिवाय राहणार नाहीत.

हे सर्व सांगायचे कारण म्हणजे, जलसंपदा विभागाने आगामी वर्षासाठी मंजूर केलेला पाणीकोटा. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमानुसार पुणे महापालिका दर वर्षी पुण्याला किती पाण्याची आवश्यकता आहे, याचे अंदाजपत्रक सादर करीत असते. ते अंदाजपत्रक पाहून जलसंपदा विभाग पुण्याला किती पाणी द्यायचे, याचा निर्णय घेते. दरवर्षीच्या नित्यनियमानुसार पुणे महापालिकेने २०२६-२७ या वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले. पुण्यातील वाढत्या लोकसंख्यचे दाखले देऊन महापालिकेने २१.३४ टीएमसी पाण्याची मागणी केली. गेल्या वर्षी महापालिकेने २२ टीएमसी पाण्याची मागणी केली होती. यंदा खडकवासला धरणसाखळी प्रकल्पांमध्ये पाणी कमी आहे. गेल्या वर्षी आजअखेर खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार प्रमुख धरणांमध्ये २८.५६ टीएमसी पाणी म्हणजे सुमारे ९७ टक्के धरणे भरलेली होती. यंदा २४ टीएमसी म्हणजे सुमारे ८२ टक्केच पाणीसाठा आहे. ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे राज्यात दुष्काळाचे संकट उभे राहिले असताना पुणे महापालिकेने पुढाकार घेऊन १० टक्के कपात करण्यासाठी दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्याद्वारे वर्षभरात २.३० टीएमसी पाणी बचत करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असणार आहे. जलसंपदा विभागाने महापालिकेच्या अंदाजपत्रकानुसार १४.२७ टीएमसी थेट पाणी कोटा आणि १.९१ टीएमसी पाणी गळती गृहीत धरून १६.११ टीएमसी पाणी कोटा मंजूर झाल्याचे पत्र महापालिकेला पाठवले. मात्र, विहिरी, कूपनलिका आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगमधून पुण्याला ४.८५ टीएमसी पाणी उपलब्ध होत असल्याचा दावा करून पुणे महापालिकेची जास्त पाणी देण्याची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे पुण्याला जलसंपदा विभागाने प्रत्यक्षात ११.३३ टीएमसीच पाणी उपलब्ध करून देण्याचा डाव खेळला.

मात्र, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्यापैकी १३ टीएमसी पाणीसाठा ऑगस्ट अखेरपर्यंत शहरासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे पुणेकरांना विहिरी, कूपनलिका आणि रेनवॉटर हार्वेस्टिंगमधून ४.८५ टीएमसी पाणी मिळते का?

पुण्यात वाड्यांमध्ये विहिरी होत्या. वाडे जमीनदोस्त झाले आणि विहिरी बुजल्या. मात्र, जलसंपदा विभागाला त्याच विहिरी दिसत आहेत. मात्र, उजवा मुठा कालव्यालगत अनेक विहिरींकडे सोयीस्कर काणाडोळा केला जात आहे. या विहिरी कालव्यातील पाण्यांवर तुडुंब भरलेल्या असतात. कालव्यातून होणाऱ्या गळतीवर या विहिरी काठोकाठ भरत असतात. त्यातील पाणी टँकरने समाविष्ट गावांमध्ये पुरविले जाते. त्याचा हिशेब कोणीच ठेवत नाही. हे पाणी कोणाचे?

‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’द्वारे पुणेकरांना पाणी उपलब्ध होते, असे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. शहरात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’, सौरऊर्जा, गांडूळखत यांपैकी कोणताही एक उपक्रम राबविल्यास मिळकतकरात पाच टक्के सवलत, तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त उपक्रम राबविल्यास मिळकतकरामधून दहा टक्के सवलत देण्यात येते. पुण्यात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या मिळकतदारांची संख्या ३० हजार ८१३ आहे. उर्वरित ठिकाणी ही सुविधा नाही. तरीही, जलसंपदा विभाग ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’मुळे पुणेकरांना मुबलक पाणी मिळत असल्याच दावा करत आहे.

पुणे शहरातील भूजल साठ्यांचे संवर्धन करण्यासाठी तलाव, धायरी येथील गावतळे आणि उत्तमनगर येथील काही भागांत भूजल साठा वाढविण्यासाठी दिल्ली येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स’ या संस्थेच्या मदतीने प्रायोगिक तत्त्वावर भूजल प्रकल्प राबविण्यात आला. तसेच, ‘भूजल बोअरवेल मॉनिटरिंग ॲप’ची चाचणी घेणाऱ्या प्रायोगिक प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली. त्यासाठी शहरातील निवडक भागात ३०० कूपनलिकांच्या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले. बाणेर आणि पाषाणमधील ७२, औंधमधील ६२, कर्वेनगर आणि कोथरूडमधील ८२, मध्यवर्ती भागातील पेठा आणि शिवाजीनगर भागातील ७० आणि सोलापूर रस्त्यावरील ३४ कूपनलिकांचा समावेश होता. त्यातून भूजलाची स्थिती समाधानकारक दिसली नाही. पाण्यात विरघळलेले ऑक्सिजन (डीओ), अशुद्ध पाण्यातील रासायनिक पदार्थांचे विघटन करण्यासाठी आवश्यकता असलेले ऑक्सिजन (सीओडी) आणि पाण्यातील जैविक पदार्थांच्या प्रदूषणाचा मापदंड (बीओडी) याबाबत पुण्यातील नदी, तलाव यांमधील पाण्याबाबत निराशाजनक परिस्थिती असताना भूजलाबाबत काय स्थिती असेल, हे सांगायची गरज नाही. तरीही जलसंपदा विभाग म्हणते पुणेकर भूजलाचा वापर करतात, याला काय म्हणायचे?

पुणेकरांना कमी पाणी मिळावे, यासाठी जलसंपदा विभागाने वापरलेल्या युक्तीला दाद द्यावी लागेल. मात्र, वास्तवता वेगळीच आहे. पुण्यात दररोज लाखो लोक पुण्यात येतात आणि जातात. त्या चल लोकसंख्येचा पाणीकोटा वाढवून देण्यासाठी विचार करीत नाही. पण विहिरी, कूपनलिका आणि ‘रेन वार्टर हार्वेस्टिंग’द्वारे पाच टीएमसी पाणी पुणेकर घेतात, असा दावा करते. पुणेकरांनी हा दावा का स्वीकारावा?

sujit.tambade@expressindia.com