पुणे : गेल्या तीन दिवसांपासून शहरात पडत असलेला पाऊस आणि पालख्यांचे शहरात होत असलेले आगमन या पार्श्वभूमीवर पुणे शहरात सुरु असलेली पाणीकपात रद्द करुन नियमीत पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आज (मंगळवार) ७ जुलैपासून नागरिकांना नियमित पाणी दिले जाणार असल्याची घोषणा महापौर मंजूषा नागपुरे यांनी केली.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळीत उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन करुन हे पाणी अधिक दिवस वापरता यावे, यासाठी महापालिकेने १५ जूनपासून शहरात पाणीकपात लागू केली आहे. त्यानुसार गेल्या २० दिवसांपासून दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. गेल्या तीन दिवसात शहरात तसेच धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणातील पाणीसाठा वाढत आहे. त्यातच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा ९ आणि १० जुलैला शहरात दाखल होत आहे. या सोहळ्यात लाखो वारकरी शहरात येणार असून त्यांच्या सोयीसाठी शहरात सुरु असलेली पाणीकपात रद्द करुन नियमीत पाणीपुरवठा करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिल्याचे महापौर नागपुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शहरातील पाणीकपात रविवार १२ जुलैपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार असून या काळात शहरातील सर्व भागांमध्ये पाणी देण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचे नागपुरे यांनी सांगितले.
दरम्यान, पालखी सोहळ्यानिमित्त मोठ्या संख्येने वारकरी शहरात येणार आहेत. त्यातच दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने आळंदी येथील इंद्रायणी नदीला पूर आला आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी आळंदी येथे न येता पुणे शहरातच मुक्काम करुन पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे दोन दिवस आधीच वारकरी शहरात दाखल झाल्यास त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा महापालिकेच्या वतीने उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेच्या १०१ शाळांना रविवारपर्यंत सुट्टी
देहू-आळंदीत निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे वारकऱ्यांनी आळंदी-देहूऐवजी पुण्यातून वारीत सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने वारकऱ्यांची निवास-भोजन व्यवस्थेची तयारी सुरु केली आहे. ज्या महापालिकेच्या शाळांमध्ये दिंड्या मुक्कामी असतात, अशा १०१ शाळांना आजपासून (मंगळवार) रविवारपर्यंत सुटी देण्यात आली आहे. या शाळांमध्ये आवश्यक असलेल्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचे आदेश महापौर नागपुरे यांनी दिले.
