पुणे : ‘पुण्यात राहणाऱ्या नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. सध्या शहराला मंजूर करण्यात आलेला ११.३३ टीएमसी पाणीकोटा अपुरा आहे. त्यामुळे यामध्ये वाढ करून हा कोटा महापालिकेच्या मागणीनुसार १६.१९२ टीएमसी मंजूर करावा,’ अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ‘पुरेसे पाणी देता येणार नसेल, तर ‘पुणे द मोस्ट लिव्हेबल सिटी इन इंडिया’ (राहण्यास योग्य शहर) हा किताब मिरविण्यात काय अर्थ,’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

शहराचा होणारा विस्तार, वाढणारे नागरीकरण आणि येणाऱ्या काळात पुणे शहरात येणारे विविध उद्योग यामुळे निर्माण होणाऱ्या रोजगारांच्या संधी यामुळे लोकसंख्या वाढत आहे. शहराची लोकसंख्या जवळपास ७३ लाखांवर गेली असून, महापालिकेने सर्व बाबींचा विचार करून १६.१९२ टीएमसी पाण्याची मागणी केली आहे.

मात्र, जलसंपदा विभागाने २०२६-२७ या वर्षासाठी केवळ ११.३३ टीएमसी पाणी निश्चित केले आहे. त्यामुळे शहराच्या वाढत्या गरजांच्या तुलनेत हा पाणीकोटा अत्यंत अपुरा असल्याचे विरोधी पक्षनेते निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

‘शहरासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारण्याचे काम सुरू असून, त्यातून पुढील दोन महिन्यांत तीन ते चार टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर वाढविण्याचे महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करण्याची कार्यवाहीदेखील प्रस्तावित आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

‘शहराला ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर’ म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे. विविध क्षेत्रांतील ३६० पेक्षा अधिक बहुराष्ट्रीय कंपन्या पुणे परिसरात कार्यरत आहेत. या कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत असून, देशभरातून नागरिक पुण्यात स्थायिक होत आहेत. त्यामुळे शहराची लोकसंख्या आणि पाण्याची गरज सातत्याने वाढणार आहे.

तसेच, पुणे मेट्रोचा विस्तार, टीओडी झोन, ‘यूडीसीपीआर’ अंतर्गत वाढलेला ‘एफएसआय’ आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमुळेही शहराच्या लोकसंख्येत मोठी वाढ होणार आहे. शहराला पुरेसा पाणीपुरवठा करणे ही महापालिकेची जबाबदारी असली, तरी त्यासाठी आवश्यक पाणीसाठा उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही शासनाने पार पाडली पाहिजे,’ असेही निकम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.