पुण्यातील उपनगरे, तसेच समाविष्ट गावांत होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे तेथील नागरिक त्रस्त आहेत. गगनचुंबी इमारतींत टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. पाण्यासाठी आवश्यक असलेले हे टँकर गेल्या काही दिवसांत मात्र वाहनचालकांमध्ये धडकी भरवणारे ठरले आहेत. गेल्या १५ दिवसांत टँकरच्या धडकेत तिघांचे बळी गेले. पोलिसांनी टँकरचालकांसह मालकांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध गुन्हेही दाखल केले.

मात्र, गुन्हे दाखल करून अपघात रोखले जाणार नाहीत, हेदेखील लक्षात घेणे गरजेचे आहे. अपघात रोखण्यासाठी टँकरचालक आणि मालकांशी संवाद साधून उपाययोजना करण्याची गरज आहे. पुणे शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली.

प्रमुख रस्त्यांवरील कोंडी दूर करून वाहतुकीचा वेग वाढविण्यासाठीच्या उपाययोजना काही महिन्यांपूर्वी केल्या. रस्त्यांची विविध कामे करण्यात आली. पण, समस्या पूर्णपणे सुटलेल्या नाहीत. टँकर अपघात याच पार्श्वभूमीवर झाले आहेत. वानवडीत टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार अभियंता तरुणीचा मृत्यू झाला, तर महंमदवाडीत टँकरच्या धडकेत १९ वर्षीय दुचाकीस्वार महाविद्यालयीन युवकाने प्राण गमावले.

त्यानंतर बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार हाॅटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (२५ एप्रिल) घडली. बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर झालेल्या अपघातानंतर टँकरचालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली, तेव्हा टँकरच्या तंदुरुस्ती प्रमाणपत्राची मुदत संपल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले.

अशा प्रकारे किती टँकर शहरातून धावत असतील? आता हेदेखील तपासण्याची वेळ आली आहे. असे टँकर इतर वाहनचालकांच्या दृष्टीने ‘यमदूत’च, असे म्हटले तर वावगे ठरू नये. शहरातील विविध रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात असली, तरी बंदी आदेश धुडकावून डंपर, ट्रक, सिमेंट मिक्सर सर्रास भरधाव जातात. बहुतांश अपघात वेग आणि अवजड वाहनचालकांच्या चुकीमुळे झाल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे.

अशा प्रकारच्या वाहनांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. अपघात करणारे वाहन जप्त करण्याच्याही सूचना त्यांनी केल्या. मात्र, या बंदीला मालवाहतूकदारांनी विरोध केला. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाई करू नये, अशी वाहतूकदार संघटनेची मागणी आहे. ही मागणीही रास्त असली, तरी शहरात गेल्या काही दिवसांत घडलेले बहुतांश अपघात अवजड वाहनचालकांच्या चुकांमुळे घडले आहेत, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.

भरधाव टँकरच्या धडकेत अपघात होण्याच्या घटना वाढल्यानंतर पोलिसांनी टँकरमालक आणि चालकांची कोंढवा पोलीस ठाण्यात नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत पोलिसांनी टँकरमालक, चालकांना सूचना दिल्या. कोंढवा, वानवडी, उंड्री, पिसोळी, हांडेवाडी या उपनगरातील नागरी संघटनांच्या प्रतिनिधींनीही सूचना मांडल्या. ‘टँकरचालकांनी मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, टँकर मालकांनी चालकाची चारित्र्य तपासणी करावी, टँकरची तांत्रिक तपासणी वेळोवेळी करावी, टँकरची रचना पाहता ३६० अंशात फिरणारे कॅमेरे टँकरवर बसवावेत, वेगावर नियंत्रण ठेवावे,’ अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.

टँकर असो वा अन्य अवजड वाहने, फक्त कारवाई करून प्रश्न सुटणार नाही. टँकरचालकांनी स्वयंशिस्त पाळणेही गरजेचे आहे. तसेच, यंत्रणा आणि अवजड वाहनचालक यांच्यातही चांगला संवाद असायला हवा. काहीही झाले, तरी ही वाहनेदेखील वाहतूक व्यवस्थेचा भाग आहेत. बेशिस्तांविरुद्ध कडक कारवाई आणि वाहनचालक, मालकांशी सातत्याने संवाद साधून अपघात रोखण्याबाबत प्रबोधन यामुळे निश्चितच काही फरक पडेल. त्यासाठी वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन विभागाने एकत्र येऊन ठोस उपायोयजना करणे गरजेचे आहे.
rahul.khaladkar@expressindia.com