पुणे : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा अधिकाधिक काळ टिकविण्यासाठी पुणे महापालिकेने पाणीपुरवठ्याचे नियोजन बदलले. सध्या दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येतो. दिवाळीनंतर तर दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महापालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे पुणेकरांसमोर पाण्याचे नवे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. विशेषतः शहराच्या उपनगरांमध्ये असलेल्या मोठ्या गृहसंकुलांना पाण्याची गरज भागविण्यासाठी खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागणार आहे. पाणीकपात असो, वा नसो, सूस, बाणेर, बालेवाडी, पाषाण याबरोबरच नऱ्हे, आंबेगाव, कात्रज, कोंढवा, मुंढवा, लोहगाव, विमाननगर, वाघोली या भागांतील अनेक सोसायट्यांना कायमच टँकरद्वारे पाणी घ्यावे लागते. मात्र, धरणांत पाणी कमी असताना या टँकरमध्ये नेमके कुठून पाणी येते, असा प्रश्न आहे.
शहरातील अनेक मोठ्या सोसायट्यांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता भासते. महापालिकेकडून दिवसाआड पाणीपुरवठा झाल्यास उपलब्ध पाण्याचा साठा पुरवून वापरण्याचे आव्हान सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांसमोर असेल. पाण्याची कमतरता जाणवू लागल्यानंतर साहजिकच खासगी टँकर मागविण्याचे प्रमाण वाढतील.
पण, या टँकरमधील पाण्याचा स्रोत काय, ते पिण्यास योग्य आहे का, त्याची गुणवत्ता तपासण्यात आली आहे का, असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची खातरजमा केली जात नसल्याचे यापूर्वी अनेकदा उघड झाल्याने ते अधिक गंभीर.
अनेक टँकरचालक खासगी विहिरी वा विंधनविहिरींतून पाणी भरून त्याची विक्री करतात. या पाण्याची गुणवत्ता, त्यातील जीवाणू, रासायनिक घटक याबाबत नेमकी माहिती नसते. त्यामुळे केवळ पाण्याची उपलब्धता पाहून टँकर मागविणे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. काही दिवसांपूर्वी विमाननगर परिसरातील एका सोसायटीला पिण्याचे पाणी म्हणून चक्क प्रक्रिया केलेले पाणी पुरविण्यात आले होते. या घटनेमुळे टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय झाल्यास अशा प्रकारांना पुन्हा खतपाणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. साहजिकच, टँकरमधील पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी कोण करणार, हा कळीचा प्रश्न आहे. सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी टँकर मागविताना संबंधित चालकाकडून पाण्याचा स्रोत, पाणीपुरवठ्याची अधिकृत परवानगी आणि पाण्याच्या गुणवत्तेचा तपासणी अहवाल मागविणे आवश्यक आहे. पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची स्वतंत्र तपासणी करून घेणेही गरजेचे आहे. केवळ कमी दरात किंवा तातडीने पाणी उपलब्ध होते म्हणून कोणत्याही टँकरकडून पाणी स्वीकारणे धोक्याचे ठरू शकते.
महापालिकेनेदेखील या परिस्थितीकडे केवळ पाणीबचतीच्या दृष्टिकोनातून न पाहता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शहरात टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणे, पाण्याचे स्रोत निश्चित करणे, नियमित नमुने तपासणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या टँकरचालकांवर कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा, धरणांतील पाणीसाठा वाचविण्याच्या प्रयत्नांत पुणेकरांना अशुद्ध पाणी पिण्याची वेळ येऊ शकते, यात कोणतीही शंका नाही.
