पुणे : ‘महापालिका आणि जलसंपदा विभागात सुरू असलेल्या पाणीपट्टी थकबाकीच्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच बैठक घेणार आहेत,’ अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शुक्रवारी दिली.
महापालिका आणि जलसंपदा विभागात पाणीपट्टी बिलाच्या थकबाकीवरून अनेक वर्षांपासून वाद आहेत. थकबाकीची रक्कम न भरल्यास शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना महापालिका आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, ‘नागरी वापरासाठी महापालिकेकडून पाणी घेतले जाते. जलसंपदा विभागाबरोबर झालेल्या करारानुसार घरगुती आणि व्यावसायिक दराने पाण्याची देयके दिली जातात. जलसंपदा विभाग मात्र औद्योगिक वापराच्या दराने पाणीपट्टीची देयके पाठवित आहे. तसेच, थकबाकीवर दहा टक्के दंडाची आकारणीही केली जात आहे. या बाबत जल प्राधिकरणाकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे महपाालिकेने तक्रार केल्यानंतरच त्यांनी बैठकीचे आश्वासन दिले आहे.’
दरम्यान, शहरातील पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीने तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक करणात येणार आहे. त्या दृष्टीने नियोजन सुरू झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
