पुणे : शहरातील हवामानाच्या दृष्टीने यंदाचा एप्रिल वैशिष्ट्यपूर्ण ठरला. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत एप्रिलमध्ये शिवाजीनगर येथील कमाल तापमानात घट झाली असून, गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक ६६.२ मिलिमीटर पाऊस एप्रिलमध्ये नोंदवला गेला आहे. पुढील काही दिवस कमाल तापमानात फार वाढ होण्याची शक्यता नसल्याने वातावरण सुसह्य राहू शकते.
यंदा एप्रिलची सुरुवातच जोरदार पावसाने झाली. शहर आणि परिसरात दोन एप्रिल रोजी वादळी पाऊस झाला. शिवाजीनगर येथे एका दिवसात ६५ मिलिमीटर पाऊस पडला. या पावसाने एप्रिलमधील एका दिवसातील सर्वाधिक पावसाचा १३० वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. त्यापूर्वी शिवाजीनगर येथे ४ एप्रिल १८९६ रोजी ५१.१ मिलिमीटर पाऊस झाला होता. गेल्या दहा वर्षांतील आकडेवारीचा आढावा घेतला, तर २०२३ मध्ये ३७ मिलिमीटर पावसाची नोंद आहे. ते पाहता, यंदा एप्रिलमधील पावसाने नवा विक्रम नोंदवल्याचे स्पष्ट झाले आहे.
पावसाळी सुरुवातीनंतर शहर आणि परिसरात टप्पाटप्प्याने कमाल तापमानात वाढ होत गेली. १२ एप्रिलपर्यंत ३७ अंश सेल्सियस तापमान होते. त्यानंतर सातत्याने ३९ ते ४० अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. २७ एप्रिल रोजी यंदाच्या एप्रिलमधील सर्वाधिक ४१.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. गेल्या दहा वर्षांचा आढावा घेतला असता २०१९मध्ये २८ एप्रिल रोजी ४३ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा एप्रिलमधील सरासरी कमाल तापमानात घट झाल्याचे दिसून येते.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे वेधशाळेतील शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांत कमाल तापमानामध्ये वाढ झाली. शिवाजीनगर येथील तापमान ४० अंश सेल्सियसच्या पलीकडे गेले होते. आता कमाल तापमानामध्ये काही प्रमाणात घट होत आहे. पुढील काही दिवसांत कमाल तापमान ३७ ते ३९ अंश सेल्सियसदरम्यान राहू शकते.
गेल्या दहा वर्षांतील एप्रिलमधील पाऊस (मिलिमीटरमध्ये)
२०२६ – ६६.२
२०२५ – ७.५
२०२४ – ११.४
२०२३ – ३७
२०२२ – ००
२०२१ – २८.३
२०२० – ०.३
२०१९ – १.७
२०१८ – ००
२०१६ – ००
२०१६ – २.४
२०१५ – ००
चौकट २
गेल्या दहा वर्षांतील कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)
२०२६ – ३७.९
२०२५ – ३९.३
२०२४ – ३९.६
२०२३ – ३७.७
२०२२ – ३९.२
२०२१ – ३७.६
२०२० – ३८.६
२०१९ – ३९.५
२०१८ – ३८.४
२०१७ – ३८.३
२०१६ – ३९.२
२०१५ – ३६.९
