पुणे : गेल्या काही दिवसांपासून दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळनंतर जाणवणारा गारठा, अधूनमधून पाऊस, अशा वातावरणामुळे विविध आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. शहरात डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच, विषाणूजन्य आणि संसर्गजन्य आजारांचे प्रमाणही वाढत असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. उत्सवाचा आनंद घेताना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यतज्ज्ञांनी केले आहे.

सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहराच्या तापमानात सातत्याने चढ-उतार जाणवत आहेत. त्याआधी शहरात झालेल्या दमदार पावसानंतर वातावरणात अचानक बदल झाला. पाऊस ओसरल्यानंतर दुपारच्या वेळी कडक ऊन, तर संध्याकाळनंतर हवेत वाढणारा गारठा, अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. या बदलत्या वातावरणाचा शरीराच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होत असून, सर्दी, ताप, अंगदुखी यांसह विविध विषाणूजन्य आजारांचे रुग्ण वाढत असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे.

पुणे महापालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीतून शहरात डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी घराच्या परिसरात पाणी साचू न देणे, डासांपासून संरक्षण करणे तसेच ताप किंवा अन्य लक्षणे जाणवल्यास वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

वैद्यकीय तज्ञांनी दिलेल्या माहीतीनुसार काय दक्षता घ्यावी-

  • भरपुर पाणी पिणे
  • बाहेरचे तळलेले पदार्थ जंकफुड खाणे टाळावे
  • आहारात हिरव्या पालेभाज्या, फळांचे प्रमाण वाढवावे
  • गर्दीच्या ठिकाणी तसेच कडक उन्हात जाणे टाळावे
  • बाहेर जाणे आवश्यक असल्यास मास्कचा वापर करणे
  • बाहेरून आल्यावर हात- पाय स्वच्छ धुणे
  • नियमित व्यायाम करणे

तज्ञ काय सांगतात ?

जनरल फिजिशियन डॉ, अनिकेत जोशी अधिक माहिती देताना सांगतात की,
गेल्या पाच-सहा दिवसांपासून तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर येत आहे. हवामानात एकदम बदल झाल्याने रुग्णसंख्या वाढली आहे. बरेच रुग्ण विषाणूजन्य आजारांचे आहेत. डेंग्यू आणि चिकुनगुनियाचेही निदान होत असल्याने सगळ्यांनीच काळजी घेण्याची गरज आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्कचा वापर करणे आवश्यक आहे.

अशी माहिती स्त्री-रोग तज्ज्ञ डॉ. गिरिजा वाघ यांनी दिली. बदलत्या हवामानात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यांनी फ्लू लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. तसेच स्त्रियांना पोटाचे विकार, अपचनाचा त्रास जाणवू शकतो.

अशा प्रतिकूल परिणाम लहान मुलांवर अधिक होऊ शकतो असे नमूद करत ससून सर्वेापचार रुग्णालय बालरोग विभाग प्रमुख डॉ.आरती किणीकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की,
बदलत्या हवामानाचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर लगेच प्रतिकूल परिणाम होतो. श्वसनाद्वारे होणारे आजार, संसर्गजन्य आजार मुलांना बाधू शकतात. यासाठी या लहान मुलांनी गर्दीमध्ये, भर उन्हात जाणे टाळावे. मुलांचे लसीकरण झाले नसेल, तर ते गरजेचे आहे. त्याने त्यांची प्रतिकारक्षमता वाढेल.