पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भ, मराठवाड्यासह पुणे आणि परिसरातही जोरदार पाऊस पडला. मात्र, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाऊस कमी होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे. तसेच, ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे.
‘एल निनो’ स्थितीमुळे जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असताना पुण्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. जुलैमधील सर्वाधिक पावसाचा ११९ वर्षांचा विक्रमही मोडीत निघाला. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची पश्चिमेकडे वाटचाल होत आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे घाट परिसरात पावसाचा जोर आहे. तसेच, शहरातही पावसाच्या सरी पडत आहेत. गुरुवारी जवळपास रात्रभर पाऊस पडला. शुक्रवारी दिवसभरात पावसाचा जोर कायम होता.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी साडेपाचपर्यंत शिवाजीनगर येथे २९.८, हडपसर येथे २९.६, कोरेगाव पार्क येथे २३, तळेगाव येथे १३.५, चिंचवड येथे २८.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर घाट परिसरातील ताम्हिणी येथे १६०, लोणावळा येथे ६४, शिरगाव येथे ९५, डुंगरेवाडी येथे १६३, दावडी येथे १६१, मुळशी येथे ३० मिलिमीटर पाऊस पडला.
ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ अनुपम कश्यमी म्हणाले, ‘बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाब क्षेत्र पश्चिमकडे सरकताना त्याची तीव्रता कमी होऊन त्याचे रूपांतर आता दाब क्षेत्रात झाले आहे. ही प्रणाली सध्या पश्चिम विदर्भ आणि लगतच्या प्रदेशावर स्थित आहे. पुढील २४ तासांत त्याची तीव्रता आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १ ऑगस्टच्या संध्याकाळपासून पुण्यासह राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.’
सध्याच्या हवामान प्रणालीची तीव्रता आता कमी होत आहे. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते. तसेच, ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. – एस. डी. सानप, हवामानशास्त्रज्ञ, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे वेधशाळा
