पुणे : वाढत्या तापमानामुळे पुणे आणि परिसरात पारा चाळीशीपारच असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी शिवाजीनगर येथे ४१.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून, २०१६पासूनचे मे महिन्यातील सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे. पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती राहणार असल्याची माहिती हवामानतज्ज्ञांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरातील तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. रविवारी शिवाजीनगर येथे ४१.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार शहरातील सरासरी कमाल तापमान आणि प्रत्यक्षातील कमाल तापमानात मोठी तफावत दिसून येत आहे. त्यानुसार सोमवारी शिवाजीनगर येथे तफावत ४.१ अंश सेल्सियस होती. शिवाजीनगर येथे ४१.६, लोहगाव येथे ४३.८, चिंचवड येथे ४०.७, मगरपट्टा येथे ४०.८, वडगाव शेरी येथे ४१.२, हडपसर येथे ४०.१, पाषाण येथे ३९ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.
ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील जिल्हे आणि मराठवाडा पुढील ४८ तास उष्णतेच्या लाटेच्या प्रभावाखाली राहणार आहे. तसेच राज्यात पुढील चार दिवस बहुतांश ठिकाणी कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. १२ आणि १३ मे रोजी नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, संभाजीनगर, जालना, पुण्यातील काही भागांसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर १४ आणि १५ मे रोजी नागपूर, अकोला आणि अमरावती येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार सोमवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४५.१ अंश सेल्सियस नोंदवले गेले. तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव येथे ४४.३, कोल्हापूर येथे ३८.९, मालेगाव येथे ४३.२, नाशिक येथे ४२, सांगली येथे ३९.३, सातारा येथे ४१.१, सोलापूर येथे ४२.३, कोकणातील रत्नागिरी येथे ३४, मुंबई येथे ३५.४, डहाणू येथे ३७.९, अलिबाग येथे ३८.२, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे ४३.४, परभणी येथे ४३.२, बीड येथे ४३.५, तर विदर्भातील अमरावती येथे ४४, बुलढाणा येथे ४३.२, ब्रह्मपुरी येथे ४२.२, नागपूर येथे ४२, वर्धा येथे ४३.८, गोंदिया येथे ३९.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
तब्येतीची काळजी घेणे आवश्यक
वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. पुरेसे पाणी, फळांच्या रसाचे सेवन करावे. सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत बाहेर जाणे टाळावे. उष्माघात किंवा ताप आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही अनुपम कश्यपी यांनी सांगितले.
