Heat Wave Conditions In Pune City: विदर्भात उष्णतेची लाट असताना पुणे आणि परिसरातही उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. पुणे आणि परिसरात उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती निर्माण झाली आहे. रविवारी कोरेगाव पार्क येथे सर्वाधिक ४२.९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून, त्या खालोखाल लोहगाव येथे ४२.७ अंश सेल्सियस नोंदवले गेले. पुढील दोन ते तीन दिवस तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात तीव्र उष्ण वातावरण आहे. शहरात लोहगावसारख्या भागातील कमाल तापमान सातत्याने ४० अंश सेल्सियसपेक्षा अधिक राहिले आहे. तर, शिवाजीनगर येथेही सातत्याने तापमान ४० अंश सेल्सियसच्या आसपास आहे. ४० अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमानाची पाच वेळा नोंद झाली आहे,

तर १२ दिवसांपेक्षा जास्त वेळा ३९ अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले आहे. या पार्श्वभूमीवर, रविवारी कमाल तापमानाचा पारा शिवाजीनगर येथे ४१.८ अंश सेल्सियसवर पोहोचला. तर लोहगाव येथे ४२.७, चिंचवड येथे ४१.२, लवळे येथे ४०.५, मगरपट्टा येथे ४०.९, कोरेगाव पार्क येथे ४२.९, एनडीए येथे ३९.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

या पूर्वी २०२२ आणि २०२४मध्ये एप्रिलमध्ये शिवाजीनगर येथे ४१.८ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले होते. तर २०२५मध्ये एप्रिलमध्येच ४१.३ अंश सेल्सियस तापमान होते.तापमानात होत असलेली वाढ, उष्म्यामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. सकाळी नऊ-दहा वाजल्यापासून उन्हाची तीव्रता जाणवत आहे. सायंकाळपर्यंत उन्हाच्या झळा बसत आहेत. रात्रीच्या तापमानातही फार घट होत नसल्याने रात्रीही उकाडा, उष्मा सहन करावा लागत आहे.

तांत्रिकदृष्ट्या पुण्यात उष्णतेची लाट नाही, पण प्रभावाच्या दृष्टीने उष्णतेच्या लाटेसारखीच स्थिती आहे. येत्या तीन ते चार दिवसांत पुण्यात पावसाची शक्यता कमी आहे. दिवसाचे तापमान पुण्यासह राज्यात काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत बाहेर पडणे टाळावे, तब्येतीची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. – अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ