पुुणे : यंदा पुणे शहरात मार्चमध्येच शिवाजीनगर येथे कमाल तापमान चाळिशीच्या जवळपास पोहोचले. पण, तरी महिन्याचे सरासरी कमाल तापमान ३६.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत मार्चमधील कमाल तापमानात घट झाली. त्याचबरोबर, मार्चमधील गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक पाऊसही नोंदवला गेला. त्यामुळे मार्च महिना पुणे शहर आणि परिसरासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरला

यंदा मार्चच्या सुरुवातीपासूनच कमाल तापमानात सातत्याने वाढ होत राहिली. शिवाजीनगर येथे ३३ ते ३८.५ अंश सेल्सियस या दरम्यान कमाल तापमानाची नोंद झाली. कोरेगाव पार्क, लोहगाव, मगरपट्टा अशा काही भागांमध्ये तर शिवाजीनगरच्या तुलनेत अधिक तापमान होते. मात्र, हवामानातील बदलांमुळे अधेमधे वातावरण ढगाळ होऊन सरासरी कमाल तापमानात घट झाली. त्यामुळे सरासरी कमाल तापमान ३६.२ अंश सेल्सियस नोंदवले गेले.

गेल्या काही दिवसांत विदर्भ, मराठवाड्यासह पुण्यातही गारपीट, ढगांचा गडगडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस झाला. शिवाजीनगर येथे ३० मार्चला २६.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, २०१५मध्ये एका दिवसात ४४.१ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला होता.मोसमी पावसाच्या आधीच्या काळात हवामान प्रणालीमध्ये बदल होत असतात. सध्या बंगालचा उपसागर, अरबी समुद्रातून येणारे आर्द्रतायुक्त वारे, उंचीवरील ‘जेट स्ट्रीम’ खाली आल्यामुळे वादळी पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. एप्रिलमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.- एस. डी. सानप, हवामानशास्त्रज्ञ, भारतीय हवामानशास्त्र विभाग

पुण्यातील गेल्या दहा वर्षांतील मार्चमधील सरासरी कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)

२०२५ : ३७.६

२०२४ : ३६.५

२०२३ : ३३.४

२०२२ : ३६.७

२०२१ : ३६.६

२०२० : ३४.१

२०१९ : ३६.७

२०१८ व २०१७ : ३५.७

२०१६ : ३६

२०१५ : ३३.७

एप्रिलमध्ये ऊन-पाऊस?

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, एप्रिलमध्ये पुण्यासह देशभरात उष्णतेची लाट सरासरीपेक्षा जास्त दिवस असू शकते. तसेच, देशभरात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.