पुणे : गेल्या काही दिवसांपासून दिवसा उन्हाच्या झळा, रात्रीच्या उष्मा असे वातावरण असताना बुधवारी शहरात ठिकठिकाणी गारांचा पाऊस पडला. थोडा वेळ पडलेल्या पावसामुळे काही वेळासाठी गारवा निर्माण झाला. मात्र, रात्री पुन्हा असह्य उष्मा सहन करावा लागला. आता पुढील तीन दिवस कमाल तापमानात काही प्रमाणात घट होऊन २५ एप्रिलच्या सुमारास पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर शहरात तापमानवाढ झाली आहे. कोरेगाव पार्क, मुंढवा, शिवाजीनगर, हडपसर, लोहगाव, पाषाण अशा बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ४० अंश सेल्सियसच्या आसपास राहिले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी कमाल तापमान लोहगाव येथे ४०.७, चिंचवड येथे ३७.७, शिवाजीनगर येथे ३९.४, एनडीए येथे ३७.३ अंश सेल्सियस नोंदवले गेले.

सकाळपासूनच उन्हाचा चटका, वातावरणातील उष्णा लक्षणीयरित्या जाणवत होता. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन आकाश ढगाळ झाले, सायंकाळी चार ते पाचच्या सुमारास वाऱ्यासह अचानक पावसाला सुरुवात झाली. कोथरूड, पाषाण, औंध, बाणेर, तसेच सिंहगड रोड आणि मध्यवर्ती पेठ परिसरात गारा पडल्या. तसेच काही ठिकाणी थोडा वेळ पाऊस पडला.

एप्रिलच्या सुरुवातीला पडलेल्या पावसावेळीही हिंजवडी परिसरात गारांचा पाऊस पडला होता. गारांचा पाऊस सुरू झाल्यावर लहान मुले, मोठ्यांनीही वेचण्याचा आनंद घेतला. गारा पडतानाच्या चित्रफिती, छायाचित्रे अनेकांनी समाजमाध्यमांत प्रसिद्ध केली. साधारणपणे तासभर हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. त्यामुळे संध्याकाळी आकाश ढगाळ होऊन काही प्रमाणात हवेत गारवा निर्माण झाला.

मात्र, रात्रीच्या सुमारास पुन्हा तापमानात वाढ होऊन उष्मा जाणवू लागला. गुरुवारीही विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पुढील तीन ते चार दिवस दुपारनंतर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

रात्रीच्या असह्य उष्म्यामागील कारण काय?

सध्या वातावरणात आर्द्रता वाढली आहे, रात्रीच्या तापमानातही वाढ झाली आहे. त्यामुळे रात्री जास्त प्रमाणात उष्मा जाणवत आहे. पुढील तीन दिवस कमाल तापमानात काही प्रमाणात घट होऊन २५ एप्रिलच्या सुमारास पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिली.