पुणे : पश्चिम आशियातील युद्धामुळे देशभरात महागाईचा भडका उडाला आहे. याचे चटके आता थेट लग्न समारंभांना बसू लागले आहेत. लग्न समारंभातील जेवणाच्या थाळीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. एलपीजी सिलिंडरच्या किमतीत दुप्पट वाढ झाली असून खाद्यतेल, किराणा आणि भाज्याही महागल्या आहेत. त्याचबरोबर कामगारांचा पगारातही वाढ झाली आहे. त्यामुळे केटरिंग व्यवसायिकांनी थाळीच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

केटरिंग व्यावसायिकांनी किमती ३० ते ५० टक्क्यांनी वाढविल्या आहेत. लग्न समारंभातील थाळीची सरासरी किंमत ४०० रुपयांवरून ६०० रुपये करण्यात आली आहे. थाळीची किंमत वाढल्याने यजमानांकडूनही आकडता हात घेतला जात आहे. यजमान कडून पाहुण्यांची संख्या कमी केली जात असून पर्यायाने त्यांचाकडून थाळींची संख्या कमी होत आहे. पूर्वी ८०० ते १ हजार ताटे एका कार्यक्रमात असत. आता त्यांची संख्या ४०० ते ५०० ताटांवर आहे. याच वेळी मुंज, बारसे असे छोटे कार्यक्रम १५० ते २०० ताटांवरून ५० ते १०० ताटांवर आले आहेत, अशी माहिती केटरिंग व्यावसायिकांनी दिली.

सध्या हॉटेल आणि केटरिंग व्यवसायासमोर महागाईची मोठी समस्या आहे. त्यात एलपीजी गॅस सिलिंडर दरवाढ प्रमुख आहे. याचबरोबर खाद्यतेलासह किराणा सामान आणि भाज्याही महागल्या आहेत. कामगारांचे हातावर पोट असल्याने त्यांनाही याचे चटके बसत आहेत. त्यामुळे कामगारांच्या पगारातही वाढ करावी लागली आहे. आधी एलपीजी टंचाईमुळे या हॉटेल आणि केटरिंग व्यवसाय अडचणीत आले होते. आता एलपीजी पुरवठा सुरू झाल्यानंतर वाढत्या महागाईने या व्यवसायांसमोर संकट निर्माण झाले आहे, अशी माहिती पुणे रेस्टॉरंट अँड केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी दिली.

एलपीजी वाढीने गणित बिघडले

पश्चिम आशियातील युद्धापासून व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ सुरू आहे. ही किंमत फेब्रुवारीमध्ये सुमारे १ हजार ७०० रुपये होती. आता ती ३ हजार २०० रुपयांपर्यंत गेली आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे सुरुवातीला एलपीजी सिलिंडर पुरवठा खंडित झाला होता. आता पुरवठा सुरळीत असला, तरी सिलिंडरची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच वेळी खाद्यतेलाच्या किमतीतही सातत्याने वाढ सुरू आहे. भाज्याही महागल्या असून, या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम केटरिंग व्यवसायावर होत आहे. त्यामुळे मार्चपासून थाळीच्या किमतीत सरासरी ५० टक्के वाढ झाली आहे.

लग्न समारंभातील थाळीची सरासरी किंमत

आधी – ४०० रुपये

आता – ६०० रुपये

केटरिंग कामगारांचा रोजचा पगार

आधी – ६०० ते ८०० रुपये

आता – १ हजार ५०० रुपये