पुणे : ‘शीळ घालीत माणसं अजून गाऊ शकतात.हातात हात गुंफून अजून जाऊ शकतात’ ही कविवर्य मंगेश पाडगावकर यांची प्रशांत दामले यांनी गायलेली कविता सर्वांनाच ठाऊक आहे. एकेकाळी शी्ळ म्हणजे शिट्टी वाजविणे हे चांगल्या रीतीचा नसल्याचे समजले जात होते. पण, ही कला आत्मसात करून पुण्यातील शीळवादक महिलेने मुंबई येथील जोडीदारासमवेत कलाविष्कार सादर करून जागतिक भरारी घेतली आहे. ‘अबोली’ यांच्या अव्यक्त बोलीला जपानमध्ये झालेल्या स्पर्धेत तिसरे पारितोषिक मिळाल्याने पुणेकरांची मान उंचावली गेली आहे.

कोथरूडमध्ये वास्तव्यास असलेल्या अबोली ठोसर यांनी मुंबई येथील निखिल राणे यांच्यासवेत ‘वन ट्यून टू सोल’ हा कलाविष्कार सादर केला. त्यामध्ये दोघांनी ‘अलाईट आर्ट्स’ वर्गवारीमध्ये सादर केलेल्या कलाविष्काराला तिसरा क्रमांक मिळाला. जपानमध्ये २१ जून रोजी संपलेल्या या स्पर्धेत अबोली आणि निखिल यांनी बसवलेले नाटक सादर केले ज्यामध्ये संवादाच्या ऐवजी शिट्टी वाजवून अभिनय सादर केला. ‘जागतिक स्तरावर झालेल्या या स्पर्धेत आपल्याला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली त्यामुळे खूप छान वाटले आणि आपल्या देशासाठी करंडक घेऊन आम्ही आलो त्याबद्दल नक्कीच खूप आनंद होत आहे,’ अशी भावना अबोली ठोसर यांनी व्यक्त केली.

‘जपानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ‘वर्ल्ड व्हिसलिंग कन्व्हेंशन’ भरविण्यात येते. एक वर्षाआड आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धेचे यंदा ४७ वे वर्ष होते. तीन कॅटेगरीज होत्या त्यातील ‘अलाईड आर्ट्स’मध्ये भारताला तिसरा क्रमांक मिळाला. अलाईड आर्ट्स म्हणजे तुम्ही काहीतरी एक असा दुसरा कला प्रकार शिट्टीसमवेत प्रस्तुत करायचा. आम्ही एक नाटक बसवले होते आणि त्या नाटकात संवादाच्या ऐवजी आम्ही शिट्टी वाजवून अभिनय केला. जगभरातले लोक या संपर्धेमध्ये सहभागी होतात. ऑनलाईन ऑडिशनमध्ये निवड झाल्यानंतर अंतिम फेरीसाठी जपानला निमंत्रित करण्यात आले,’ असे अबोली यांनी सांगितले.

‘लहानपणापासून शीळवादनाची असलेली सवय ही छंद म्हणून जागतिक स्तरावर घेऊन जाईल, असे स्वप्नातही कधी वाटले नव्हते. माझे बाबा श्रीपाद राजपाठक हे उत्तम शीळवादक होते. त्यांच्याकडून मला शीळवादनाची प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळाले. गांधर्व महाविद्यालयात मी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. विविध वाद्यवृंदांमध्ये मी गायिका म्हणून सहभागी झाले होते.

मी शिट्टीतूनच गाणं गुणगुणायचे. शास्त्रीय संगीतातील चीजा, बंदिशी, आलाप आणि तराणे हेदेखील मी शिट्टीवर वाजवायचे. एमसीएस (मास्टर इन काॅम्प्युटर सायन्स) झाल्यानंतर मी दहा वर्षे इन्फोसिसमध्ये काम केले. विवाहानंतर छायाचित्रण कलेचा छंद जोपासण्यासाठी पतीने प्रोत्साहन दिल्यानंतर नोकरी सोडली आणि पूर्णवेळ व्यावसायिक छायाचित्रकार म्हणून गेल्या १५ वर्षांपासून काम करत आहे. कोथरूडमध्ये स्वतःचा फोटोग्राफीचा स्टुडिओ असून तेथे मी लोकांना फोटोग्राफी शिकवते आणि कमर्शियल फोटोग्राफी पण करते, असे अबोली यांनी सांगितले.

करोनाच्या काळात मी बाळंत झाले. नवजात मुलीला त्याचप्रमाणे मी आणि पती, आम्हा दोघांनाही करोना झाला होता. त्या कालखंडात श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे माझा शिट्टी वाजविण्याचा ‘स्टॅमिना’ कमी झाला होता. प्राणायाम आणि योगासनांच्या मदतीने त्यावर मात करून पुन्हा शीळवादन कला आत्मसात केली. त्याचे चीज झाले. – अबोली ठोसर, शीळवादक