पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे सर्वच पक्षांकडून प्रचार न करता मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर देण्यात आल्याने पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सरासरी ६८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्या निवडणुकीत ७०.३५ टक्के मतदान झाले होते. बारामतीत दु:खाचे वातावरण असल्याने मतदारांमध्ये निरुत्साह होता. त्यामुळे सुमारे ५३ टक्केच मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले.

पुणे जिल्हा परिषदेचे ७३ गट आणि पंचायत समितीचे १४६ गण आहेत. त्यासाठी २९ लाख ७६ हजार ८०५ मतदार होते. त्यापैकी सरासरी ६८ टक्के मतदारांनी मतदान केले. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासांत ७.७४ टक्के मतदान झाले. त्यानंतर साडेअकरा वाजेपर्यंत सरासरी २१ टक्के, दुपारी दीड वाजता ३० टक्के, दुपारी साडेतीन वाजता ५१ टक्के मतदान झाले. शेवटच्या दोन तासांत मतदानाचे प्रमाण फारसे न वाढल्याने सरासरी ६८ टक्के मतदान झाले.

बारामतीत कमी मतदान

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने या वेळेच्या निवडणुकीवर दुःखाचे सावट होते. त्यामुळे कोणत्याही पक्षांनी जाहीर सभा न घेता मतदारांच्या गाठीभेटी घेऊन प्रचारावर भर दिला. बारामतीत गेल्या निवडणुकीत सुमारे ६१ टक्के मतदान झाले होते. या वेळच्या निवडणुकीत मतदारांमध्ये निरुत्साह असल्याने अवघे सरासरी ५३ टक्के मतदान झाले.

बारामतीत पहिल्या दोन तासांत अवघे ६.५२ टक्के मतदान झाले. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत ६.५२ टक्के मतदारांनी मतदान केले. त्यानंतर साडेअकरा वाजेपर्यंत १८ टक्के, दुपारी दीडपर्यंत ३० टक्के आणि दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शेवटच्या दोन तासांमध्येही मतदार घराबाहेर न पडल्याने अवघे ५३ टक्के मतदान झाले.

अजित पवारांची ‘राष्ट्रवादी-भाजपमध्ये लढत

पुणे जिल्हा हा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला समजला जातो. १९९९ वर्षांपासून जिल्हा परिषदेचा कारभार अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली सुरू होता. मात्र, अजित पवार यांच्या अकाली निधनाने या निवडणुकीवर दु:खाचे सावट आहे. जिल्हा परिषदेच्या ७३ गटांपैकी ५९ गटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजप हे महायुतीतील दोन मित्रपक्ष समोरासमोर आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र निवडणूक लढवित आहेत. ७३ गटांपैकी अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’चे ७१ उमेदवार आहेत. शरद पवारांच्या ‘राष्ट्रवादी’चे सात ठिकाणी उमेदवार आहेत. आंबेगाव, मावळ आणि मुळशी तालुक्यांमध्ये दोन्ही ‘राष्ट्रवादी’ समोरासमोर आहेत.

भाजपचे ५९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महायुतीतील शिवसेना (शिंदे) पक्षही स्वबळावर निवडणूक लढवित आहे. त्यांनी ३६ ठिकाणी उमेदवार केले आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) हे दोन्ही पक्ष स्वबळावर नशीब आजमावणार आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे २६ उमेदवार आहेत. याशिवाय काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे), वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) आणि बहुजन समाजवादी पक्ष (बसपा) या पक्षांनीही उमेदवार उभे केले आहेत. मात्र, खरी लढत ही अजित पवारांची ‘राष्ट्रवादी’ आणि भाजप यांच्यामध्ये आहे.

जिल्हा परिषदेतील सध्याचे बलाबल

गेल्या निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसने ४४ जागा जिंकून जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवली. तत्कालीन शिवसेनेला १३, भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी सात जागांवर समाधान मानावे लागले होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे काटेवाडीत मतदान

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला.