पुणे : पती-पत्नी आणि मुलगा असे तीन जणांचे कुटुंब. पती-पत्नी दोघेही कमावते. रोजचा स्वयंपाक घरच्या घरी आणि या जोडीला इलेक्ट्रिक वाहन ( ईव्ही) असल्याने वाढत्या पेट्रोलच्या खर्चाचा बोजाही नाही. तरीही या कुटुंबाला महिन्याला २.२ लाख रुपये खर्चाला पुरत नाहीत. पुण्यातील एका कुटुंबाचे हे प्रातिनिधिक चित्र असून, त्यामुळे शहरातील जगण्याचा वाढलेला अवाजवी खर्च समोर आला आहे.

पुण्यातील स्मृती सिंग या महिलेने सोशल मीडियावर मासिक खर्चाबाबत केलेली पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मासिक खर्चाचा ताळमेळ दिला आहे. स्मृती, त्यांचा पती आणि लहान मुलगा असे तिघांचे कुटुंब आहे. त्यांचा मासिक खर्च २.२ लाख रुपये आहे. त्यांच्या उत्पन्नातील मोठा वाटा लहान मुलाच्या पाळणाघरासाठी जातो. स्मृती घरून काम करीत असल्याने दिवसातील चार ते पाच तास त्या मुलाला पाळणाघरात ठेवतात. या पाळणाघराचा मासिक खर्च ३० हजार रुपये असून तो त्यांच्या दरमहा घरभाड्यापेक्षा जास्त आहे. त्यांना दरमहा २८ हजार रुपये घरभाडे आहे.

किराणा खर्च

सिंग कुटुंबाचा किराणाचा खर्च २० हजार रुपये आहे. त्यात दूध, भाजीपाला आणि इतर किराणा सामानाचा समावेश आहे. बाहेर जाणे आणि हॉटेलमध्ये जेवणे यासाठी त्यांचे दरमहा १५ हजार रुपये खर्च होतात. त्यांचा इंटरनेटचा मासिक खर्च केवळ ५०० रुपये आहे परंतु, विजेचे बिल ६ हजार रुपये आहे. यंदा उन्हाळा कडक असल्यामुळे त्यांचे विजेचे बिल वाढले आहे.

इतर खर्च

सिंग कुटुंबाच्या इतर खर्चात अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्यात स्मृती यांचा पती झोमॅटोवरून दरमहा सुमारे ३ हजार रुपयांचे खाद्यपदार्थ मागवतो. कुटुंबाच्या शॉपिंगसाठी त्यांचा मासिक खर्च सुमारे १५ हजार रुपये आहे. त्यात पती-पत्नी व मुलाचा समावेश आहे. घरकाम करणाऱ्या मोलकरणीला त्यांना दरमहा १ हजार ८०० रुपये द्यावे लागतात.

सर्वाधिक खर्च कोणता?

सिंग कुटुंबाचा सर्वाधिक खर्च हा नवीन घराच्या कर्जाच्या हप्त्याचा आहे. त्यांचा मासिक गृहकर्ज हप्ता १.१ लाख रुपये आहे. त्यामुळे एकूण मासिक खर्चातील निम्मे पैसे हे कुटुंब गृहकर्ज हप्त्यावर खर्च करीत आहे. स्मृती सिंग यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. पुण्यासारख्या शहरात तीन जणांच्या कुटुंबासाठी मासिक २.२ लाख रुपये खर्च योग्य आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

अनेक प्रश्न उपस्थित

स्मृती यांच्या पोस्टवर अनेक जणांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. अनेक जणांनी त्यांच्या खर्चावर प्रश्न उपस्थित केले आहेत. घरून काम करत असताना मुलाला पाळणाघरात ठेवायची गरज का, पाळणाघराचा मासिक खर्च एवढा होत नाही, घरीच स्वयंपाक करीत असताना झोमॅटोवरून खाद्यपदार्थ मागवण्याची आवश्यकता का, अनावश्यक खर्च खूप आहेत, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया या पोस्टवर आल्या आहेत.