पुणे : तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलेची पर्स चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. पर्समध्ये दहा हजारांची रोकड, दागिने असा ७० हजारांचा ऐवज होता.
याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोंढवा परिसरातील उंड्री भागात राहायला आहे. महिला नातेवाईकांसोबत शनिवारी (२८ जून) खरेदीसाठी आली होती.
दुपारी बाराच्या सुमारास महिला तुळशीबागेतील कावेरे कोल्ड्रीग दुकानासमोरील बोळातून निघाली होती. त्या वेळी गर्दीत चोरट्याने महिलेकडील पर्स हिसकावून नेली. महिलेने आरडाओरडा केला. चोरटा गर्दीतून पसार झाला. तुळशीबागेतील विक्रेत्यांनी चोरट्याचा पाठलाग केला. त्यानंतर महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस कर्मचारी सुरवसे तपास करत आहेत.
तुळशीबागेत महिलांकडील दागिने चोरणे, पर्स हिसकावणे अशा प्रकारचे गुन्हे यापूर्वी घडले होते. त्यामुळे या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पोलिसांनी तुळशीबागेतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चोरट्याचा माग काढण्यात येत आहे.
महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली
दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी दुचाकीस्वार चाेरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना नगर रस्त्यावरील खराडी भागात घडली. याबाबत एका महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिला आणि तिची मैत्रीण दुचाकीवरून गुरुवारी (२७ जून) रात्री साडेअकराच्या सुमारास खराडी परिसरातून निघाल्या होत्या. न्याती माॅलसमोर दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक कोळपे तपास करत आहेत. शहरात पादचाऱ्यांकडील दागिने, तसेच मोबाइल संच हिसकावून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.