पुणे : डोबिंवलीतील शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी एका महिला डाॅक्टरला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच येरवडा भागात एकाने ७५ वर्षीय डाॅक्टरला धमकावून ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला. आरोपीने तीक्ष्ण शस्त्र उगारून रुग्णालयाच्या परिसरात दहशत माजविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी धमकी देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एका डाॅक्टरने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७५ वर्षीय डॉक्टराचा येरवड्यातील जयजवाननगर भागात खासगी दवाखाना आहे. ते येरवडा भागातील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड परिसरात राहायला आहेत. आरोपी ८ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास रुग्णालयात आला. त्याने डाॅक्टरांना तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखविला. त्यांच्याकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली, असे डाॅक्टरने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

डॉक्टरला खंडणीसाठी धमकाविल्यानंतर आरोपी रुग्णालयातून बाहेर पडला. त्याने रस्त्यावर येऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली; तसेच शस्त्र उगारून रस्त्यावर दहशत माजविली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली.

आरोपीविरुद्ध खंडणी मागणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरवसे तपास करत आहेत.

रुग्णालयाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांकडून रुग्णालयाची तोडफोड करणे, डाॅक्टर, तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धमकावून मारहाण करणे, तसेच रुग्णालयाची तोडफोड करण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा प्रकारच्या घटना घडल्यास, रुग्णालयात दहशत माजविणे, डाॅक्टरांना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत.