पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमास (एमबीबीएस) प्रवेश मिळवून देण्याची आमिषाने राज्यातील अनेक विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक करणाऱ्या तेलंगणातील एकाला येरवडा पोलिसांनी अटक केली. आरोपीने आतापर्यंंत ४० विद्यार्थांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपीविरुद्ध हैद्राबाद, मुंबईत फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल आहेत.

अरविंद प्रकाशकुमार आराेगोंडा (वय ४७, रा. सिंकदराबाद, तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका पालकांची आरोपी अरविंद आरोगोंडा याने आठ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी १८ मार्च रोजी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आरोपीला मुंबई पोलिसांनी फसवणुकीच्या एका गुन्ह्यात त्याला अटक केली होती. त्याला ऑर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. पुण्यातील येरवडा परिसारातील आरोपीने फसवणूक केल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने त्याला येवडा पोलिसंनी तपासासाठी ऑर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले.

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलुमुला, सहायक आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय ठाकर, उपनिरीक्षक किशोर बेरड, मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, संदीप जायभाय, साईनाथ म्हस्के यांनी ही कामगिरी केली.

वैद्यकीय प्रवेश मार्गदर्शनासाठी पुणे, मुंबईत केंद्र

आरोपी आणि त्याचा साथीदाराने एडव्हिओ लर्निंग सोल्यूशन्स प्रा. लि. नावाची कंपनी हैद्राबादमध्ये सुरू केली होती. या कंपनीच्या पुणे, मुंबईत शाखा सुरू केल्या होत्या. विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याची जाहिरात त्याने समाज माध्यमात प्रसारित केली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश मार्गदर्शनासाठी पाच लाख रुपये, खासगी महाविद्यालयात प्रवेशासाठी तीन लाख रुपये असे शुल्क तो आकारत होता. वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश न मिळाल्यास पैसे परत करु, असे आमिष त्याने दाखविले होते. आतापर्यंत त्याने ४० विद्यार्थी, तसेच पालकांची फसवणूक केल्याचे तपासाता उघडकीस आले आहे.