पुणे : येरवडा कारागृह प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबविली. कारागृहाच्या परिसरात झडती घेण्यात आल्यानंतर बराकीत पाच मोबाइल संच, दोन पाॅवर बँक, चार्जिंग वायर सापडली. कारागृहाच्या आवारात मोबाइल संच सापडल्यानंतर कैदी मोबाइलचा वापर करत असल्याची मिळाली आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सहायक तुरुंगाधिकारी सुनील गायकवाड यांनी याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कैदी नौशाद बद्रुद्दीन शेख याच्यासह अन्य कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यत आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी येवडा कारागृहात गायकवाड हे नियमित गस्त (संचार फेरी) गस्त घालत होते.
त्या वेळी कारागृहातील भिंतीजवळ असलेल्या स्वच्छतागृहाजवळ एक कैदी थांबला होता. त्याच्या संशयास्पद हालाचली गायकवाड यांनी टिपल्या. शेख याची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याने जमिनीवर मोबाइल संच पडल्याचे सांगितले. उडवाउडवीची उत्तरे देऊन तो बराकीत गेला. त्यानंतर गायकवाड यांनी याबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल दिला. त्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार ते सायंकाळी साडेसहा दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात आली.
बराक क्रमांक एकमधील कैदी नौशाद शेख राहत असलेल्या बराक क्रमांक एकची झडती घेण्यात आली. तेथे ठेवलेल्या एका पिशवीची तपासणी करण्यात आली. तेव्हा तपासणीत एक मोबाइल संच, बॅटरी, सीमकार्ड, चार्जिंग वायर सापडली. त्यानंतर बराक क्रमांक एक, दोन, सहाची झडती घेण्यात आली. चार मोबाइल संच, बॅटरी, दोन पाॅवर बँक सापडल्या. कारागृहात मोबाइल वापरास बंदी असताना आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक कुंदन सत्रे तपास करत आहेत. यापूर्वी येरवडा कारागृहात मोबाइल संच सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. येरवडा कारागृहात मारामारी, तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून वर्षभरापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

