पुणे : येरवड्यातील पं. जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्र संचलित बालकांच्या निरीक्षण गृहात एका अल्पवयीनाला पाईपने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी निरीक्षण गृहातील सुरक्षा रक्षकाविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिमोन सुरेश साबळे (वय ४२) यांनी याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या सुरक्षारक्षकाला नोटीस बजाविण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील पं. जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्र आहे. या केंद्रात गंभीर, तसेच किरकोळ गुन्हे करणाऱ्या अल्पवयीनांना बाल न्याय मंडळाच्या आदेशाने ठेवण्यात येते. अल्पवयीनांचे समुपदेशन या केंद्रात केले जाते. निरीक्षण गृहातील एका अल्पववयीनाची भांडणे झाली होती. त्याने एका अल्पवयीनाला मारहाण केली होती. त्यानंतर निरीक्षण गृहातील सुरक्षारक्षकाने अल्पवयीनाला प्लास्टिक पाईपने मारहाण केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर साबळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक सत्रे तपास करत आहेत.

निरीक्षण गृहात अल्पवयीनांमध्ये होणाऱ्या किरकोळ वादाातून हाणामारीच्या घटना यापूर्वी घडल्या हाेत्या. तीन वर्षांपूर्वी निरीक्षण गृहातील भिंती उडी मारुन अल्पवयीन पसार झाल्याची घटना घडली होती. निरीक्षण गृहाचे कामकाज येरवड्यातील बाल न्याय मंडळाच्या मार्गदर्शनानुसार चालते. अल्पवयीनांचे समुपदेशन, तसेच त्यांच्या सुधारणा घडविण्यासाठी विविध उपक्रम बाल न्याय मंडळाच्या मार्गदर्शनाखाली चालविण्यात येतात.

पिस्तूल बाळगणारा अल्पवयीन ताब्यात

देशी बनावटीचे बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या एका अल्पवयीनाला खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल, तसेच एक काडतूस जप्त करण्यात आले. सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल परिसरात ही कारवाई करण्यात आली.

दांडेकर पूल परिसरात खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी गस्त घालत होते. त्या वेळी एक अल्पवयीन दांडेकर पूल परिसरात थांबला असून, त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी आझाद पाटील यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे पिस्तूल सापडले. अल्पवयीनाने पिस्तूल का बाळगले ?, तो गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत होता का ?, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम राजमाने, उपनिरीक्षक गौरव देव, सुरेंद्र जगदाळे, अमोल राऊत, आझाद पाटील, शेखर खराडे, चेतन आपटे, किरण पड्याळ यांनी ही कारवाई केली.