पुणे : सत्ताधाऱ्यांबद्दल असंतोष व्यक्त करत समाज माध्यमावर ‘कॉकरोच जनता पार्टी”ने सध्या धुमाकूळ घातला आहे. महागाई ,बेरोजगारी , घटत्या रोजगाराच्या संधी या आणि अशा अनेक समस्यांमुळे तरुणाईमध्ये सत्ताधाऱ्यांबद्दल तीव्र नाराजी आहे. या “कॉकरोच जनता पार्टी’ विषयी सत्ताधाऱ्यांकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आली नसली तरी काल पुण्यात एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी चक्क आपल्या भाषणात या “कॉकरोच जनता पार्टी’ची पाठच थोपटली.
स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्याला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हजेरी लावली होती. आपल्या भाषणात त्यांनी तरुणाई ही देशाची ताकद आहे असे सांगताना चक्क “कॉकरोच जनता पार्टी’वरच नाव न घेता भाष्य केले.
गृहराज्यमंत्र्यांनी आपल्या संपूर्ण भाषणात माजी सरन्यायाधीश आणि “कॉकरोच जनता पार्टी यांचा उल्लेख टाळला असला तरी आपल्याला काय म्हणायचे आहे, हे ठळकपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले.
“एखाद्या तरुणाला छेडले तर काय होते हे आपण पाहिले आहे. एका व्यक्तीने तरुणाला कॉकरोच बोलण्याची हिंमत केली. कॉकरोच काय करू शकतो हे दाखवून दिले आहे. एखादा अणुबॉम्ब जरी फुटला तरी कॉकरोच ला काहीच होत नाही असा हा कॉकरोच असतो. त्यामुळे तरुणाई काय करू शकते, हे आपण गेल्या काही दिवसात पाहत आहोत. म्हणूनच तरुण ही आपल्या देशाची महाराष्ट्राची ताकद आहे. या तरुणाला न्याय देण्याचे काम नक्कीच आम्ही करू’ असे वक्तव्य करत एकप्रकारे ‘कॉकरोच जनता पार्टी’ला समर्थनच दिल्याचे दिसून आले. त्यांच्या या विधानावर उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र, मंचावर उपस्थित सत्ताधारीऱ्यांनी त्यांच्या या भूमिकेकडे एकप्रकारे सूचक दुर्लक्ष केले.
