पुणे : मद्यपान, अमली पदार्थ, तंबाखू अशा व्यसनांच्या परिणामांची जाणीव असूनही तरुणांची व्यसनाकडे वळण्याची जोखीम वाढत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. १६ ते १९ वयोगटातील विद्यार्थी मद्यपानाबाबत उत्सुक असून, वयाने मोठ्या मुलांमध्ये मादक पदार्थांमध्ये तीव्र कुतुहल आहे. तर स्क्रीनच्या अतिवापरामुळे होणाऱ्या शारीरिक बौद्धिक नुकसानाकडे पालकांचे दुर्लक्ष होत असल्याचे या अभ्यासातून दिसून आले आहे.
ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट, ज्ञान प्रबोधिनी प्रज्ञा मानस संशोधिका यांनी ‘पुणे शहरातील तरुणाईची व्यसनाधीनतेला बळी पडण्याच्या शक्यतेची सद्यस्थिती अभ्यास २०२५’ हे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात जानेवारी ते मार्च २०२५ या काळात शहरी आणि निमशहरी भागातील शासकीय, खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील १३ ते २२ वयोगटातील ८८२ मुलगे आणि १००५ मुली अशा एकूण १ हजार ८८७ तरुणांचा समावेश होता. तसेच पालक, शिक्षक, समुपदेशक, डॉक्टर आणि सामाजिक क्षेत्रातील नेत्यांसह 77 प्रौढ व्यक्तींनी गटचर्चा, मुलाखतींद्वारे अभ्यासात सहभाग नोंदवला. या अहवालाचे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
मद्यपान हानिकारक असल्याचे सर्वश्रुत असले, तरी त्याला सामाजिक मान्यताही मिळताना दिसत आहे. ६० टक्क्यांहून अधिक जणांनी मद्य सहज उपलब्ध असल्याचे सांगितले. १७ ते १९ वयोगटातील विद्यार्थी मद्याबद्दल सर्वाधिक उत्सुक आहेत, तर किशोरवयीन गटातील सहापैकी एकाने किमान एकदा मद्य सेवन केल्याचे सांगितले. त्यात बिअर हे सर्वाधिक सहज उपलब्ध आणि वापरले जाणारे मद्य आहे. वाढत्या वयानुसार अधिक तीव्र मद्याचे सेवन वाढत जाते. मद्यपानाचा कल कुटुंब आणि सामाजिक वातावरणामुळे निर्माण होऊन पुढे मित्रांद्वारे सामान्यीकरणाकडे सरकत असल्याचे निदर्शनास आले.
अनेक किशोरवयीन मुलांना अधूनमधून तंबाखू सेवन करणे हानिकारक नसल्याचे, तणाव कमी करण्याचे साधन वाटते. गुटखा आणि तंबाखू चघळणे हे सर्वाधिक प्रचलित प्रकार असून त्यानंतर सिगरेटचा क्रम लागतो. ९२ टक्के तरुणांना सिगारेटच्या दुष्परिणामांची माहिती आहे, तर जवळपास ४० टक्क्यांनी आपल्या आसपास तंबाखू सेवन होताना पाहिले आहे.१७ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुलांमध्ये हुक्का आणि वेपिंगचा अनुभव घेण्याचे प्रमाण दिसून आले.
शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थांचा शिरकाव झाला नसल्याचे अनेकांना वाटत असले, तरी वस्तुस्थिती वेगळी असल्याचे सर्वेक्षणातून अधोरेखित करण्यात आले आहे. सर्वेक्षणातील २० टक्के जणांनी त्यांच्या परिसरात अमली पदार्थांची उपस्थिती असल्याचे नोंदवले. व्यसनी मित्रांद्वारे अंमली पदार्थांच्या संपर्कात येण्याची शक्यता वाढते. मुलांना या पदार्थातून आपण काय शरीरात घेत आहोत याची पूर्ण कल्पना नसते. अंमली पदार्थांची उपलब्धता तंबाखूच्या तुलनेत कमी असली, तरी गांजा आणि भांग अशा मादक पदार्थांची उपलब्धता आणि वापर तुलनेने जास्त असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ऊर्जावर्धक पेय सेवनामुळे होणाऱ्या संभाव्य हानीबाबत जागरूकता खूपच कमी आहे. सर्व वयोगटांमध्ये या पेयांचे सेवन वाढत आहे. उर्जावर्धक पेयांचा संबंध स्वतःच्या कार्यक्षमतेशी जोडला जात आहे. च्या दुष्परिणामांविषयी जागरूकता सर्व वयोगटांत ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. विशेषतः परीक्षा काळात आणि रात्री ताजेतवाने राहण्यासाठी विद्यार्थी याचा वापर होत असून ही पेये सुरक्षित असल्याचे विद्यार्थ्यांना वाटते, असे सर्वेक्षणात मांडण्यात आले आहे.
इंटरनेटचा वापर किंवा स्क्रीन टाइममध्ये १३ ते १६ वयोगटातील जास्तीत जास्त मुले एक ते दोन तास, १७ ते १९ वयोगटातील ४० टक्के तरुण दिवसाला तीन ते सहा तास, तर २० ते २२ वयोगटातील सुमारे ६० टक्के तरुण तीन ते सहा तासांहून अधिक काळ इंटरनेट वापरतात. काहीतरी सुटून जाण्याच्या भीतीमुळे (फोमो) निद्रानाशाचे प्रमाण वाढले आहे. करोना काळात अपरिहार्यतेमुळे सुरू झालेला डिजिटल उपकरणांच्या वापराता वेळ आता झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे याला हानिकारक सवय मानली जात नाही, असे नमूद करण्यात आले आहे.
अहवालातील शिफारसी
* शाळांमध्ये नियमित वेळापत्रकात भावनिक नियमन, जीवनकौशल्य सत्रांचा समावेश
* डिजिटल वेलबीईंग प्रशिक्षण अनिवार्य
* मुलांमधील प्राथमिक भावनिक आणि वर्तणुकीशी संबंधित अस्वस्थतेची लक्षणे ओळखण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण
* नियोजित जागरूकता आणि संवाद सत्रांद्वारे पालकांचा सहभाग
* शाळा किंवा गट स्तरावरील समुपदेशकांमार्फत सुरक्षित, कुठल्याही लेबलशिवाय समुपदेशनाची उपलब्धता
* पालकांनी दर आठवड्याला मुलांशी संवाद साधणे, मुलांचे विनाकारण मूल्यमापन न करणे, कुठल्याही विषयावर बोलता येईल असा विश्वास मुलांच्या मनात निर्माण करणे,
* कला, क्रीडा, स्वयंसेवा या क्षेत्रात परवडणाऱ्या संधींची निर्मिती शालेय अभ्यासक्रमात भावनात्मक सक्षमता आणि डिजिटल आरोग्य यांचा समावेश
व्यसनाधीनतेबाबतचे सखोल आकलन आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा सर्वेक्षणाचा उद्देश आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच अभ्यास आहे. या अहवालाकडे सामूहिक जबाबदारी म्हणून पाहणे गरजेचे आहे.
नंदकिशोर राठी, विश्वस्त, ताराचंद रामनाथ ट्रस्ट
किशोरवयीन मुलांमध्ये अमली पदार्थ, डिजिटल व्यसनांना बळी पडण्याच्या शक्यतांचा शोध घेण्याचे कार्य या अभ्यासाद्वारे करण्यात आले. समाज म्हणून आपल्या तरुण पिढीबद्दल किती सतर्क आणि संरक्षणात्मक राहणे आवश्यक आहे याचा शोध या अभ्यासातून मांडण्यात आला आहे. – डॉ. अनघा लवळेकर, संचालिका, ज्ञान प्रबोधिनी प्रज्ञा मानस संशोधिका
