पुणे : ‘डेटींग ॲप’वर झालेली ओळख एका तरुणाला महागात पडली. काेंढवा भागात एका तरुणाला बोलावून त्याच्याकडील दागिने आणि रोकड असा ८० हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आल्याची घटना घडली.

या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २७ वर्षीय तरुण नगर रस्त्यावरील वाघोली परिसात राहायला आहे. ११ जानेवारी रोजी तो मोबाइलवर एक डेटींग ॲप पाहत होता. त्या वेळी एकाने त्याला संदेश पाठविला. त्यानंतर तक्रारदार तरुणाने त्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. ‘कोठे राहतो ?’ अशी विचारणा तरुणाने त्याच्याकडे केली. त्यानंतर आरोपीने रात्री नऊच्या सुमारास कोंढव्यातील शीतल पेट्रोल पंपाजवळ तरुणाला भेटायला बोलाविले. त्या वेळी तीन तरुण तेथे थांबले होते. तरुणांनी त्याला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखविला.

कोंढव्यातील पानसरेनगर परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत तरुणाला घेऊन गेले. त्याला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्याकडील मोबाइल संच, अंगठी काढून घेतली. तरुणाला धमकावून एटीएममधून पैसे काढण्यास सांगितले. तरुणाकडील रोकड, मोबाइल संच, अंगठी असा ऐवज काढून घेतला. या प्रकाराची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन तिघे जण पसार झाले. पसार झालेल्या चोरट्यांचे वय अंदाजे २० ते २२ वर्ष असल्याचे तक्रारदार तरुणाने फिर्यादीत म्हटले आहे. घाबरलेल्या तरुणाने नुकतीच कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी शीतल पेट्रोल पंप परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक गावडे तपास करत आहेत.

मैत्रीच्या जाळ्यात ओढून लूटमारीच्या घटना

‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढून लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. मंगळवार पेठेतील जुना बाजार परिसरात एका तरुणाला बोलावून लुटण्यात आल्याची घटना घडली होती, तसेच मगरपट्टा भागातील एका संगणक अभियंत्याला चोरट्यांनी लुटले होते. सिंहगड रस्ता परिसरातील एका व्यावसायिकाला धायरीत बोलावून त्याला लुटण्यात आल्याची घटना गेल्या वर्षी घडली होती. या प्रकरणाचा तपास करुन पोलिसांनी चोरट्यांना अटकही केली होती. ‘डेटिंग ॲप’च्या जाळ्यात ओढून तरुणाला धमकावून लुटणे, तसेच त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहे. समाज माध्यमातून शक्यतो अनोळखी व्यक्तींशी मैत्री करु नये, तसेच डेटींग ॲपच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. डेटीग ॲपवर झालेल्या ओळखीतून पाषाण रस्त्यावरील एका संशोधन संस्थेतील तरुणाचा सूस परिसरातील टेकडीवर खून करण्यात आल्याची घटना वर्षभरापूर्वी घडली होती.