भारत हा सध्या सर्वांत तरुण देश बनला आहे. देशातील सुमारे ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. याचमुळे भारत जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश आहे. या तरुणांना देशात कोणत्या प्रकारच्या संधी आपण उपलब्ध करून देत आहोत, हे महत्त्वाचे. याचे मूल्यमापन करण्यासाठी ‘फ्युचर ऑफ इंडिया फाउंडेशन’ने महाराष्ट्रातील तरुणांसाठी असलेल्या संधींचा अहवाल जाहीर केला आहे. या मूल्यमापनासाठी प्रमुख पाच निकष वापरण्यात आले. त्यात सध्याच्या कार्यबलातील तरुणांचा सहभाग, त्यांना उपलब्ध असलेल्या संधी, नोकरी, शिक्षण आणि कौशल्य यांचा समावेश आहे. विविध सरकारी विभागांकडे उपलब्ध असलेल्या विदेच्या आधारे या निकषांवर प्रत्येक जिल्ह्याची कामगिरी ठरविण्यात आली आणि त्यांचा ‘यूथपॉवर’ गुणांक ठरविण्यात आला.

राज्याचा ‘यूथपॉवर’ गुणांक १०० पैकी ४७.३ आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात नियमित वेतन असलेल्या नोकऱ्या अधिक असून, तरुणांमधील बेरोजगारीचा दरही कमी आहे. मोठ्या उद्योगांची संख्या अधिक असल्याने नियमित नोकरदार अधिक आहेत. राज्यातील तरुणांची लोकसंख्या ३.१६ कोटी असून, त्यांचे कार्यबलातील प्रमाण ४६.१ टक्के, बेरोजगारीचा दर ७.७ टक्के, अकुशल तरुण २३ टक्के आणि कार्यबलातील महिलांचे प्रमाण २७.१ टक्के आहे. राज्यातील पदवीधर तरुणांपैकी बेरोजगार राहणाऱ्यांचे प्रमाण अतिशय कमी आहे. याचबरोबर पदवी पात्रपेक्षा कमी पातळीवरील नोकरी करणाऱ्या पदवीधरांचे प्रमाणही कमी आहे. राज्यात ‘यूथपॉवर’मध्ये मुंबई पहिल्या ६६ गुणांसह पहिल्या स्थानी आहे. मुंबई उपनगर ६५ गुणांसह दुसऱ्या स्थानी, ठाणे ५९ गुणांसह तिसऱ्या स्थानी तर पुणे ५८ गुणांसह चौथ्या स्थानी आहे.

राज्याच्या सरासरी कामगिरीचा विचार करता पुण्याची पाचही निकषांवर कामगिरी चांगली आहे. पुण्यात युवकांसाठी संधीचा गुणांक ६२ असून, नोकरी ५३, शिक्षण ६८, कौशल्य ५१ आणि कार्यबलातील सहभागाचा ५५ गुणांक आहे. पुण्यातील एकूण कामगारांपैकी तीन चतुर्थांश नियमितपणे वेतन मिळणारे नोकरदार आहेत. प्रत्येक कामगाराकडून होणारे मूल्यवर्धन हे पुण्यात तुलनेने अधिक असून, त्यांच्या उत्पादकतेमुळे ते अधिक चांगले वेतन मिळवत आहेत. नियमित वेतन मिळणाऱ्या नोकऱ्यांचे प्रमाण अधिक असणे हे रोजगाराची गुणवत्ता चांगली असल्याचे निदर्शक आहे. मात्र, या नियमित नोकऱ्यांमध्ये लेखी करार, सामाजिक सुरक्षा आणि पगारी रजा या गोष्टींचा काही प्रमाणात अभाव जाणवत आहे. स्थानिक रोजगारांमध्ये लघु व मध्यम उद्योगांचा वाटा अधिक आहे. इतर जिल्ह्यांपेक्षा महिला अधिक स्वतंत्र आहेत. मात्र, मुलींचे लवकर विवाह होण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्यांचे शिक्षण लवकरच थांबविले जात असल्याचे वास्तवही या अहवालातून समोर आले आहे.

कार्यप्रशिक्षणाच्या संधी अधिक

पुण्यात तरुणांना मानधनासह कार्यप्रशिक्षणाच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र, सरकारी यंत्रणेच्या बाहेर असलेल्या शाळांची संख्या अधिक असल्याने त्यांचे शुल्क अधिक आहे. यामुळे त्याचा आर्थिक भार कुटुंबांवर पडत आहे. याचवेळी उच्च शिक्षण हे प्रामुख्याने खासगी असल्याने त्याचाही आर्थिक बोजा आहे. त्यामुळे शिक्षण सर्वांना परवडणारे असण्याची गरजही यातून अधोरेखित झाली आहे.

sanjay.jadhav@expressindia.com