पुणे : पूर्ववैमनस्यातून दोन युवकांवर टोळक्याने कोयत्याने वार केल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावर घडली. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव नाईकनवरे (वय १७, रा. शंकरमहाराज वसाहत, धनकवडी), कार्तिक गायकवाड (वय १६, रा. संभाजीनगर, धनकवडी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत शीतल सचिन नाईकनवरे (वय ४०) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईकनवरेचा शंकरमहाराज वसाहत परिसरातील काहीजणांशी वाद झाला होता. नाईकनवरे आणि गायकवाड हे सोमवारी (१६ जून) रात्री पावणेअकराच्या सुमारास कामावरून घरी निघाले होते. पुणे-सातारा रस्त्यावरील चव्हाणनगर कमानीजवळ टोळक्याने त्यांना अडवले आणि नाईकनवरे आणि त्याचा मित्र गायकवाड यांच्यावर कोयत्याने वार केले.
टोळक्याने नाईकनवरे याच्या डोक्यात काेयता मारला. हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण तपास करत आहेत.