पुणे : ग्रामीण भागातील विशेषतः जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद शाळांच्या दर्जावाढीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदा एकूण २४ शाळांमध्ये पाचवी, सहावी, आठवी, नवववी, दहावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून, आता जिल्हा परिषद शाळांमध्येच दहावीपर्यंतचे शिक्षण मिळणे शक्य होणार आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्यात गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये टप्प्याटप्प्याने इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद शाळांच्या दर्जावाढीचे अधिकार आता जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार शाळांच्या दर्जावाढीसाठी तालुका स्तरावरून प्रस्ताव पाठवण्यात आले होते. विद्यार्थ्यांची संख्या, स्थानिक गरज, पायाभूत सुविधा यांचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार शाळांचा विस्तार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यात नैसर्गिक वाढीने इयत्ता पाचवी ते आठवी, उच्च प्राथमिक शाळांना इयत्ता नववी, दहावीचे वर्ग जोडण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
सन २०२५पासून आतापर्यंत १९ शाळांना इयत्ता पाचवीचा वर्ग, ५ शाळांना इयत्ता सहावीचा वर्ग, १२शाळांना इयत्ता आठवीचा वर्ग, तर ४ शाळांमध्ये इयत्ता नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. जिल्हा परिषद शाळेतच शाळेत इयत्ता दहावी-बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे विशेषतः मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे. येत्या काळात जिल्हा परिषद शाळांमध्ये पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्या, स्थानिक गरज आणि पायाभूत सुविधा यांचे स्थानिक यंत्रणेद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली.
ग्रामीण पुण्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आपल्या गावाजवळच सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, हा मुख्य उद्देश आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी होईल. पालकांचा शासकीय शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल. जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता बारावीपर्यंतचे सक्षम, स्वयंपूर्ण शिक्षण व्यवस्था उभी करण्याच्या दिशेने ठोस पावले टाकण्यात येत आहेत. – गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद
